लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सध्या सूर्य आग ओकत आहे. अशावेळी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, शिक्षण विभागाने दुपारी १ वाजेपर्यंत शाळा भरविण्याबाबत पत्र काढले आहे. दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे नसल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यावर्षी मार्चमध्येच तापमानाने रेकॉर्ड मोडले आहे. पारा ४२ अंशाच्या वर पोहोचला आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने एक पत्र काढून शाळा दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांची चिंता नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, अनेक शाळांत पंखे, कुलर नाहीत. काही शाळांमध्ये विद्यार्थी बाहेरगावावरून येतात. त्यांना भरदुपारी घरी जाणे कठीण होणार आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी एखाद्या शाळेत दुपारी बसून बघावे, त्यानंतर उन्हाची दाहकता त्यांना कळेल, असेही पालकांचे म्हणणे आहे. सध्या उन्हाची दाहकता बघता, शाळा सकाळच्या सत्रातच सुरू ठेवणे गरजेचे आहे. मात्र शिक्षण विभागाने दुपारी १ वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे तसेच पूर्ण क्षमतेने शाळा भरविण्याचे पत्रात नमूद केल्याने शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. उन्हाच्या तडाख्यात चिमुकल्यांचे आरोग्य कसे जपायचे, असा प्रश्न शिक्षकांसह आता पालकही उपस्थित करीत आहे.
मुलांचे आरोग्य बिघडले तर काय करणार? तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना दुपारपर्यंत शाळेत ठेवल्यास त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तापमान ४२ अंशांवर- मागील काही दिवसामध्ये सूर्य आग ओकत आहे.- सध्या स्थितीत ४२ अंशावर तापमान गेले आहे. त्यामुळे घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. एप्रिल महिन्यात यापेक्षाही उन्ह तापण्याची शक्यता आहे.
१ मे पासून सुट्या कोरोनानंतर आता निर्बंध हटविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एप्रिल महिन्यात शाळा सुरू राहणार आहे. त्यानंतर १ मेपासून विद्यार्थ्यांना सुट्या देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
पालक काय म्हणतात...
दुपारी १ वाजेपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय अगदी चुकीचा आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी येण्यासाठी दुपारी २ वाजणार म्हणजे, उन्हामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. - दीपक घोडमारे, पालक
सध्या उन्हाचा पारा वाढला आहे. अशावेळी दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत ठेवणे धोकादायक ठरू शकते. शाळेत उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजना नाही. शिक्षण विभागाने यावर उचित निर्णय घेणे गरजेचे आहे. - प्रियंका लाडे, पालक
शिक्षणाधिकारी पत्र काढून झाले मोकळे- जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर तसेच माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर या दुपारी १ वाजेपर्यंत शाळा भरविण्याबाबत पत्रक काढून मोकळे झाले आहेत.- दुपारपर्यंत शाळा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तक्रारी आल्यास काय? याबाबत मात्र फक्त कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे पालकांत संताप आहे.