युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : विदर्भातीलच नव्हे तर पुणे-मुंबईतील पर्यटक आणि निसर्गप्रेमींना भंडारा लगतच्या कोका वन्यजीव अभयारण्याने भुरळ घातली आहे. दिवसेंदिवस या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढत असून १ आॅक्टोबर ते ३१ जानेवारी या कालावधीत ३४० वाहनांची नोंद करण्यात आली. तर दोन हजारावर पर्यटकांनी जंगल सफारीचा आनंद घेतला.भंडारा शहरापासून अवघ्या वीस कि.मी. अंतरावर कोका वन्यजीव अभयारण्या आहे. २०१३ मध्ये या अभयारण्याला परवानगी देण्यात आली. नागझिरा-नवेगावबांध वन्यजीव अभयारण्या व व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा या अभयारण्यालगत आहेत. ९२.३४ चौरस कि.मी. क्षेत्रात पसरलेल्या या वनात तृणभक्षी, हिंस्त्र आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार आहे. कोका अभयारण्यात बिबटांची संख्या मोठ्या प्रमाणात असून वाघांची संख्या ही वाढीस लागली आहे. हरिण, सांबर, चितळ, नीलगाय, मोर, घुबड, रानम्हशी, निलघोडे, ससे, रानकोंबड्या, कासव, खवल्या मांजर, उदमशान आदी प्राण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.२०१८ मध्ये कोका अभयारण्य १ आॅक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. अंतर्गत रस्ते, गाईड, रेस्टारंट वाहने आणि आॅनलाईन बुकींगची सुविधा आहे. त्यामुळे गत दोन वर्षाच्या तुलनेत संख्या वाढली आहे.कोका अभयारण्यात पोषक असे वातावरण असल्याने तसेच शिकारीला प्रतिबंध असल्याने वन्यजीवांचा मुक्त संचार आहे.असे जाता येते अभयारण्यातकोका वन्यजीव अभयारण्यात जाण्यासाठी बस आणि खासगी वाहनांची सुविधा आहे. जवळचे रेल्वे स्थानक भंडारा रोड व तुमसर रोड आहे. जंगल सफारीची वेळ सकाळी ६.३० ते १०.३० तर दुपारी ३ ते ६ पर्यंत आहे. गुरुवारी जंगल सफारी बंद असते तर सायंकाळी ७ वाजतानंतर अभयारण्यातून जड वाहतुकीला प्रतिबंध आहे. पर्यटकांना स्वत:च्या किंवा भाड्याने घेतलेल्या वाहनाने सफारी करता येते.कोका अभयारण्य नव्यानेच निर्माण झाले आहे. या अभयारण्यात प्राण्यांची संख्या वाढत आहे. सोयी सुविधाही मिळत आहेत. त्यामुळे महानगरातील निसर्गप्रेमी येथे भेट देत आहेत.-वाय.टी. घोडके, प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी, कोका अभयारण्य.
कोका अभयारण्याची पर्यटकांना भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 22:26 IST
विदर्भातीलच नव्हे तर पुणे-मुंबईतील पर्यटक आणि निसर्गप्रेमींना भंडारा लगतच्या कोका वन्यजीव अभयारण्याने भुरळ घातली आहे. दिवसेंदिवस या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढत असून १ आॅक्टोबर ते ३१ जानेवारी या कालावधीत ३४० वाहनांची नोंद करण्यात आली. तर दोन हजारावर पर्यटकांनी जंगल सफारीचा आनंद घेतला.
कोका अभयारण्याची पर्यटकांना भुरळ
ठळक मुद्देजंगल सफारी : चार महिन्यात दोन हजार पर्यटकांनी लुटला आनंद