लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : दोन मुलांसह माहेरी आलेल्या बहिणीला चारचाकी वाहनाने सासरी सोडायला जात असताना वॅगनआर कारचा टायर फुटला. यात वाहन रस्त्याच्या कडेला झाडावर आदळून उलटले. अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास लाखांदूर-साकोली राज्यमार्गावरील दांडेगाव जंगल शिवारात घडली. शालिनी शामराव चिंचेकर (७०) रा. गडचिरोली असे मृत महिलेचे नाव आहे. प्रियंका काटनकर या हित व सोनायरा या आपल्या दोन मुलांसह काही दिवसांपूर्वी गडचिरोली येथे माहेरी मुक्कामी गेली होती. माहेरी काही दिवस थांबल्यानंतर रविवारी प्रियंका व तिच्या मुलांना सासरी सोडण्याकरिता प्रियंकाचा भाऊ अभिषेक, आई कल्पना व आजी शालिनी या स्वत:च्या चारचाकी वाहन क्र. एमएच ३३ व्ही ४७३३ ने साकोलीकडे जात होते.दरम्यान, लाखांदूर-साकोली मार्गावरील दांडेगाव जंगल परिसरात वॅगनआरचा पुढील चाक फुटला. यावेळी टायर फुटून वाहन अनियंत्रित झाले. वाहन महामार्गालगतच्या झाडावर आदळून उलटले. अपघातात शालिनी चिंचेकर या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य पाच जण गंभीररीत्या जखमी झाले. अपघात प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ दिघोरी मोठी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहितीवरून दिघोरी मोठीचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ग्यानिराम गोबाडे, पोलीस नायक घनश्याम कोडापे, उमेश वलके, पोलीस अंमलदार वनमाला भोंदे, पोलीस सैनिक चुन्नीलाल लांजेवार, देशमुख आदी पोलीस अधिकारी कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करीत जखमींना उपचारार्थ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. या घटनेची नोंद दिघोरी मोठी पोलिसांनी घेतली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
जखमींची नावे- या अपघातात अभिषेक नंदकिशोर चिंचेकर (२७), कल्पना नंदकिशोर चिंचेकर (४४) दोन्ही रा. गडचिरोली, प्रियंका रमनकुमार काटनकर (२९), हित रमणकुमार काटनकर (४), सोनायरा रमनकुमार काटनकर (२) तिन्ही, रा. साकोली, असे एकूण ५ जण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.