ग्रामस्थांमध्ये भीती: सायंकाळ होताच शुकशुकाटचुल्हाड (सिहोरा) : बालाघाट आणि भंडारा जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या सिहोरा परिसरातील सीमावर्ती १३ गावात वाघाची दहशत आहे. बालाघाट व भंडारा जिल्ह्याची विभागणी बावनथडी नदीपात्राने झाली आहे. सिहोरा परिसरातील गावे अंतिम टोकावर आहेत. त्या पलिकडे मध्यप्रदेशातील खैरलांजी व कटंगी तालुक्यातील गावे आहेत. या दोन्ही तालुक्यातील गावाशेजारी जंगल आहे. मागील आठवड्यापासून फुलचूर, मिरगपूर शिवारात वाघ फिरत आहे. वाघासोबत लहान छावे आहेत. या वाघाने शेतशिवारात चराईसाठी गेलेल्या चार गाई ठार केल्या आहेत. यामुळे सिमावर्ती गावात सायंकाळ होताच शुकशुकाट दिसून येत आहे. दरम्यान, बावनथडी नदीपात्रात पाणी नाही. सध्या नदीचे पात्र आटले आहे. या पात्रातून वाघांचा शिरकाव चांदपूर जंगलात होण्याची शक्यता आहे. याशिवाय गोबरवाही शिवारात वाघांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. चांदपूर जंगल रामटेकपर्यंत विस्तारित आहे. या जंगलात वाघ, बिबट आदी हिंसक प्राण्यांची भ्रमंती असल्याचे कुणी नाकारत नाही. मुरली शिवारातील बिबट्याचे दर्शन झाले होते. महिनाभरानंतर हा बिबट दिसेनासा झालेला आहे. यासंदर्भात पर्यटनस्थळांच्या जंगलात वनविभागाने पर्यटकांना भ्रमंती करण्यास बंदी घातली आहे. सावध पवित्रा घेणारे फलक लावण्यात आलेली आहेत. (वार्ताहर)
सीमावर्ती गावात वाघांची दहशत
By admin | Updated: November 29, 2014 23:15 IST