तहसीलदारांना निवेदन : तिबेट राष्ट्रीय उत्थान दिवस अर्जुनी मोरगाव : १० मार्च १९५९ रोजी चीनने तिबेटवर आक्रमण करुन तिबेट बळकावले व तिबेटीयन जनतेवर अत्याचार केले. या घटनेचा निषेध तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून रिजनल तिबेटीयन युथ काँग्रेस, भारत-तिबेट मैत्री संघ नागपूरच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.१०) प्रतापगड येथे शांती मार्च काढला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.या शांतीमार्चचे तिबेट राष्ट्रीय उत्थान दिवसाचा वर्धापन दिवस म्हणून आयोजन केले जाते. १० मार्च १९५९ रोजी तिबेटच्या तीन प्रांतातील लाखों तिबेटीयनांनी राजधानी ल्हासा येथे सामूहिकरित्या दलाई लामा यांचे दिर्घायुष्य, तिबेट एक स्वतंत्र देश आहे व चीनने तिबेटमधून निघून जावे, अशी नारेबाजी केली. चीनप्रती तीव्र विरोध दर्शवून तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी देशभक्तीचा परिचय दिला. या ऐतिहासिक दिवसाचे महत्व म्हणून तिबेट राष्ट्रीय उत्थान दिवसानिमित्त शांती मार्चचे आयोजन केले जाते. यावर्षी ५७ वा वर्धापन वर्ष आहे. तिबेटियन हा दिवस प्रांत, क्षेत्र, समाज व आपसी मतभेद विसरुन या दिवसाचे स्मरण करतात. तिबेटच्या स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्यांच्या मागण्या, देशाची ऐतिहासिक सत्यता, पूर्वजांच्या आकांक्षा व विररांच्या शूरगाथेला हृदयात कोरुन एकजुटतेने आक्रमणकारी चीनचा विरोध करुन राष्ट्रहिताच्या कार्याला पुढे नेण्याचे आवाहन तिबेट यूथ काँग्रेसने केले आहे. गुरुवारी नोरग्यालिंग तिबेटीयन वसाहत प्रतापगड येथील रिजनल तिबेटीयन यूथ काँग्रेसचे सचिव कर्मा थामजोय, अध्यक्ष केलसंग छोटक, लामा लोबसंग तेन्बा, डोलकर लामो, कर्मा शामजो, छोयबे फुन्सोक वांग्याल यांच्या शिष्टमंडळाने महामहिम राष्ट्रपती भारताचे प्रधानमंत्री, विदेशमंत्री व चीन दूतावासाचे नावे असलेले निवेदन तहसीलदार डी.सी. बोम्बर्डे यांना दिले. (तालुका प्रतिनिधी)
प्रतापगड येथे तिबेटीयनांचा शांतिमार्च
By admin | Updated: March 12, 2016 00:51 IST