भंडारा : फोटो काढण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात आरोपीने फुस लावून पळविले, अशी तक्रार भंडारा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. ही घटना २६ फेब्रुवारीला रात्री ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीला आली. या घटनेमुळे शहरात चर्चेला पेव फुटले आहे. मुलींना पळविणारी टोळी तर सक्रिय नसावी असा कयास व्यक्त केला जात आहे. माहितीनुसार २६ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास फिर्यादीची अल्पवयीन बहिण १४ वर्ष, मामे बहिण १६ वर्ष, व तीची पाहुणी म्हणून आलेली १६ मैत्रीण या तिन्ही फोटो काढण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्यांना कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याचा संशय मुलीचा भावाने तक्रारीतून व्यक्त केला आहे. भंडारा शहर पोलिसांनी तोंडी रिपोर्टवरुन कलम ३६३ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एकाच वेळी तिन्ही मुली बेपत्ता झाल्याने खळबळ माजली आहे. पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक वर्मा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
तीन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळविले
By admin | Updated: February 29, 2016 00:20 IST