आरोपींमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. आरोपीमध्ये सोनू ऊर्फ धम्मराज नेमीचंद मेश्राम (२२), भीमराज ऊर्फ गोलु नेमीचंद मेश्राम (२४) रा. सेलोटी, तर महिंद्रा बोलेरो गाडीचा चालक आकाश नीळकंठ मोहरकर (२८) यांना अटक केली आहे. चोरी केलेला माल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तालुक्यातील सालेभाटा येथील संदेश दिगंबर जांभूळकर यांच्या शेतातील ठेवलेले बाहुबली जातीचे ११ धानाच्या पोत्यापैकी आठ धानाचे पोते किमती १५००० रुपयांचा माल अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी चोरून नेल्याची घटना घडली. लाखनी पोलिसांनी मिल शेतमालकाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लाखनी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली त्यावेळी त्या शेताच्या परिसरात आशु डीजे नावाची बोलेरो गाडी उभी असल्याचे नागरिकांनी संगितले. त्यावेळी त्या गाडीचा शोध घेतला असता ती गाडी मुरमाडी येथील आकाश मोहरकर याच्या मालकीची असून त्याला आमच्या शेतातील धान आणायचे आहेत, असे सांगून गाडी भाड्याने घेतली. शेतातील आठ धानाचे पोते उचलून घेतले. तसेच लाखोरी परिसरात असलेल्या राईस मिलमधून आठ धानाचे पोते उचलले व ते धान तुमसर येथील बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेले, अशी माहिती गाडी चालकाने पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी सोनू ऊर्फ धम्मराज नेमीचंद मेश्राम व भीमराज ऊर्फ गोलु नेमीचंद मेश्राम यांना विचारपूस करण्याकरिता नेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले. पोलिसी खाक्या दाखविताच आपणच धान चोरी केल्याचे कबूल केले आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे यांच्या मार्गदर्शनात हवालदार दिगांबर तलमले, शिपाई अनिल राठोड करीत आहेत.आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
धान चोरी प्रकरणी तीन जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:17 IST