साकोली : मागील एक महिन्यापासून जांभळी येथे बिबट्याची दहशत होती. वन विभागाने या बिबट्याला मोठ्या शिताफीने गुरुवारच्या रात्री पकडले. त्यामुळे गावातील दहशतीला पूर्णविराम मिळाला असून वन कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा श्वास घेतला.साकोली तालुक्यातील जांभळी खांबा येथे मागील एक महिन्यापासून एका बिबट्याने उच्छाद मांडला होता. सुरुवातीला या बिबट्याने शेळ्या, कुत्रे, कोंबडे याची शिकार केली व नंतर एका वृद्ध महिलेला ठार केले. यानंतर सहा पिंजरे लावून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर काल बिबट सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान पिंजऱ्यात अडकला.याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. रात्रीच बिबट्याला गडेगाव येथे आणण्यात आले. तिथे त्याच्यावर औषधोपचार सुरू असून हा बिबट नर आहे. औषधोपचारानंतर त्या बिबट्याला नेमके कुठे सोडण्यात येणार आहे याची माहिती मिळाली नाही. मात्र बिबट्याला जेरबंद केल्यामुळे गावात दहशतीला पूर्णविराम मिळाला. (तालुका प्रतिनिधी)
'त्या' बिबट्यावर औषधोपचार सुरू
By admin | Updated: November 8, 2014 00:52 IST