हायस्पीड ट्रेनचा मार्ग मोकळा : वैनगंगा नदीवर पुलाला मंजुरीमोहन भोयर तुमसरदक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत राजनांदगांव-कळमना दरम्यान तिसरी ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅकला हिरवी झेंडी मिळाली आहे. तुमसर रोड स्टेशन ते मुंडीकोटा रेल्वे स्टेशन दरम्यान वैनगंगा नदीवर नवीन मेजर ब्रीज क्रमांक ११६ लवकरच बांधकाम करण्यात येणार आहे. या पूलाची किंमत २९११.६५ लाख इतकी आहे. नागपूर-बिलासपूर दरम्यान हायस्पीड रेल्वे ट्रेन सुरू करण्याच्या हालचालींना वेग आले आहे. मुंबई-हावडा दरम्यान सध्या दोनच रेल्वे ट्रॅक अस्तित्वात आहेत. बिलासपूर ते नागपूर दरम्यान तिसरी ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने हिरवी झेंडी दिली आहे. बिलासपूर ते राजनांदगांवपर्यंत तिसऱ्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम झाले आहे. राजनांदगांव ते कळमना दरम्यान तिसरी ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅकच्या कामाला सुरूवात करण्यात येत आहे. तुमसर रोड रेल्वेस्थानक ते मुंडीकोटा रेल्वे स्थानकादरम्यान वैनगंगा नदीवर नवीन मेजर ब्रीज क्रमांक ११६ वर ९ बाय ४५.७२ मीटरचा स्पॅन संदर्भात हिरवी झेंडी मिळाली आहे. यात ब्रीज क्रमांक ११६ चे फाऊंडेशन, सबस्ट्रक्चरचे ब्रीज डिझाईन आणि बांधकाम संबंधित सहाय्यक कामासहित बांधकामांचा समावेश आहे. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेने यासंबंधात तशा सुचना दिल्या आहेत. मुंबई-हावडा रेल्वेमार्गावरील विशेषत: नागपूर-बिलासपूरचे अंतर ४५९ किमी आहे. हायस्पीड रेल्वे या रेल्वे मार्गावर सुरू करण्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली होती. हायस्पीड रेल्वे सुरू करण्याकरिता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तसे संकेत येथे दिले. नागपूर-बिलासपूर अंतर हायस्पीड रेल्वे ३ ते ३.३० तासात पूर्ण करणार आहे. बिलासपूर-नागपूर दरम्यान व्यावसयीक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. नागपूर-मुंबई, सुरत, भोपाल असा हा मार्ग सोयीचा ठरणार आहे. बिलासपूर ते नागपूर दरम्यान अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जमिन भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे. तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याची गरज असून तिरोडी-कटंगी दरम्यान रखडलेले रेल्वे ट्रॅकचे काम पूर्ण करण्याची गरज आहे. ब्रिटिशकालीन हा रेल्वे मार्ग आजही उपेक्षित आहे. रेल्वे प्रशासनाला हा रेल्वे ट्रॅक दरवर्षी कोट्यवधींचा महसूल प्राप्त करून देतो, हे विशेष.
तिसऱ्या ब्रॉडगेजला रेल्वेची हिरवी झेंडी
By admin | Updated: June 7, 2016 07:30 IST