लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : सुमारे दोन महिन्यांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता अड्याळ गावात स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आले. त्यानंतर येणाऱ्या वीज बिलात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आणि संतापाची लाट उसळली आहे.
पूर्वीपेक्षा अधिक आलेल्या बिलामुळे नागरिक धास्तावले असून, मंगळवारी अड्याळ येथील संतप्त नागरिकांनी थेट वीज उपकेंद्राला धडक दिली. स्मार्ट मीटर काढणार नाही, तोपर्यंत आम्ही विजेचे बिल भरणार नाही, अशी भूमिका घेत नागरिकांनी मागणीचे निवेदन दिले. जिल्ह्यातच विद्युत स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. चोर पावलांनी विद्युत मीटर बदलण्याचे काम सुरू आहे. एप्रिल महिन्यात येथील सुजाता कन्या शाळा जवळील परिसरात मोठ्या प्रमाणात येथील विद्युत उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी जुने सुरू विद्युत मीटर काढून त्याऐवजी स्मार्ट मीटर लावले. वरून आदेश असल्याचे सांगून जबरदस्तीने हे मीटर लावण्यात आले. त्यानंतर कधी नव्हे तेवढे बिल आले. याचा जाब विचारण्यासाठी संतप्त नागरिकांनी विद्युत उपकेंद्र गाठून लेखी निवेदन दिले.
यांची होती उपस्थितीयावेळी सरिता गिरडकर, अश्विनी देशमुख, फरजाना पठाण, लक्ष्मी गभने, अल्का विनकने, उषा मुंडले, सुभाष चांदेवार, कैलास कावळे, समिला देशमुख, संजय गिरडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. वीज कायदा २००३ मिल अधिनियम क्र.४७ (५) नुसार मीटर वापरा संबंधित स्वातंत्र्य आणि कायदेशीर निवड करण्याचा अधिकार ग्राहक हक्काला बगल देऊन मीटर लावण्याचा गैरप्रकार खुलेआम सुरु आहे. कुंपणच जर शेत खात असेल तर न्यायाची अपेक्षा ग्राहकांनी कुणाकडून करायची, असा प्रश्न उपस्थित केला.