लाखांदूर :
किराणा दुकानात घरफोडी करुन २७ हजार रुपये किंमतीचे किरणा सामान चोरी केल्याच्या आरोपाखाली दोन आरोपींना २७ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. या घटनेतील एका आरोपीने पोलिसांना लाखांदूरमधील पवनी-वडसा टी पॉईंट परीसरातील एका देशी दारु दुकानात गत १० मार्च रोजी घरफोडी करुन २७ हजाराची रोकड चोरल्याची कबुली दिल्याने सदर प्रकरण देखील उघड झाले आहे.
या कबुली अंतर्गत आरोपीकडुन १८०० रुपये रोख जप्त करण्यात आले असुन ऊर्वरित रक्कम आरोपीने खर्च केल्याची माहिती देण्यात आली.
पोलीस सुत्रानुसार, गत २६ मार्च च्या रात्री स्थानिक लाखांदुर येथील मोहण किराणा दुकानात घरफोडी करुन २७ हजार रुपये किमतीचे किराणा साहित्या चोरुन नेल्याची घटना घडली होती. सदर घटनेत लाखांदुर पोलीसांनी अवघ्या ५ तासात दोन आरोपींना अटक करुन तालुक्यातील अन्य घरफोडीच्या घटनेसबंधाने विचारपुस चालविली. यावेळी घटनेतील नितेश तुळशिराम धुर्वे (२७) रा मालेवाडा ता कुरखेडा जि. गडचिरोली नामक आरोपीने गत १० मार्च रोजी देशी दारु दुकानात घरफोडी करुन २७ हजार रुपयेपय रोख चोरल्याची कबुली दिली.
त्यानुसार लाखांदुर पोलीसांनी सबंधित आरोपीकडुन १८०० रुपये रोख जप्त केले असुन ऊर्वरीत रक्कम आरोपीने खर्च केले असल्याची माहिती देण्यात आली. या दोन्ही घटनांचा तपास लाखांदुरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी या़च्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमरदिप खाडे व संदिप ताराम करीत आहेत.