लोकमत न्यूज नेटवर्कपवनी: पवनीवासीयांना शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. मात्र पवनीकरांना नळाद्वारे दूषित पाणी येत असल्याने नागरिकांत प्रचंड रोष व्यक्त होत आहे. शुद्ध व मुबलक पाणी पुरवठ्यासाठी निर्माण केलेली नवीन पाणीपुरवठा योजना कोणत्या कामाची? असा प्रश्न पडला आहे.
महाराष्ट्र नागरोत्थान स्वर्ण जयंती योजना अंतर्गत २८ कोटी रुपये खर्च करून गोसेखुर्द धरणावरून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मागील चार वर्षापासून सुरू असलेले बांधकाम आता पूर्णत्वास आले असून शहरवासीयांची पाणी मिळण्याची प्रतीक्षा संपली. शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेतून जनतेला प्रायोगिक तत्वावर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जवळपास याला दीड महिन्यांचा कालावधी होत आहे. डेंग्यू, मलेरिया, हगवण, विषमज्वर यासारखे अनेक रोगांचे थैमान नाकारता येत नाही.
जुनीच जलवाहीनी चांगली!शहरात होत असलेल्या दूषित पाणीपुरवठा संबंधाने मुख्याधिकारी यांचेशी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. प्रायोगिक तत्वावर सुरू असलेला पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत अनावश्यक कामासाठी नवीन तर पिण्याचे पाणी जुन्या फिल्टर प्लॅटमधून सोडण्यात यावे अशी मागणी संघटक यादवराव भोगे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेली आहे.
ऑपरेटर कार्यालयातनगरपरिषदेमध्ये पाणीपुरवठा पंपावर ऑपरेटरची पूर्णकालीन नियुक्ती आहे मात्र सदर व्यक्तीचे पाणीपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष असल्याने कर्तव्याकडे लक्ष नाही. हे महाशय कार्यालयातच जास्त तर पंपाकडे कमी जात असल्याने कंत्राटी पद्धतीवर नियुक्त कर्मचाऱ्यांकडून कसेबसे काम काढल्या जाते. सदर कंत्राटींना कसलाही तांत्रिक अनुभव नसल्याने कर्तव्य बजावताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याकडे नगरपरिषदेने विशेष लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.
धरण परीसरातील पंपगृहालगत दिसला वाघगोसेखुर्द धरणावर असलेल्या पंपगृह जवळ पट्टेदार वाघ दिसल्याने येथे कार्यरत कर्मचारी व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जिवाच्या भीतीने कर्मचारी पळाले. याठिकाणी पंपगृह समोरील पुलावर प्रवेशद्वाराची आवश्यकता असून कर्मचाऱ्यांना निवासस्थानाची सोय करणे गरजेचे आहे.
२८ कोटी रुपयांचा खर्च पाणीपुरवठा योजनेवर झाला आहेपवनी शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यादृष्टीने वाढीव पाणीपुरवठा तयार करण्यात आली. मात्र प्रायोगिक त्तत्वावरच पाणीपुरवठा दूषित होत आहे.
"मार्चअखेर निर्माण झालेली परिस्थितीवर मात करून शहरातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल. यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना १०० टक्के पूर्ण होईपर्यंत जुन्याच जलवाहिनी मधून पाणीपुरवठा करण्यात येईल."- डॉ. विवेक मेश्राम, मुख्याधिकारी.