लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नवभारत साक्षरता अभियानांतर्गत जिल्ह्यातील आजी आजोबांची रविवारी (दि. २३) जिल्ह्यातील विविध शाळांच्या केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांनी कौशल्य विकासाबाबत धडे गिरविले.
केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत उल्लास अॅपवर नोंदणी झालेल्या निरक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. नातवांच्या शाळेत परीक्षा देण्याची अनुभूती आजोबांना आली. या परिक्षेत दिव्यांगांचाही समावेश दिसून आला. त्यांच्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली.
कौशल्ये विकासावर भरकौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि निरक्षण, कुटुंब कल्याण आदी कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात आला.
असा होता पेपरकेंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत राबविण्यात येत आहे. १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करून देशातील निरक्षर व्यक्तींमध्ये महत्वपूर्ण कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने पेपरचे स्वरूप होते. याचा फायदा नवसाक्षरांना मिळणार आहे.
७६९ केद्रजिल्ह्यात ७६९ परिक्षा केंद्रांवरून ही परीक्षा घेण्यात आली. परिक्षेला ७,०६५ निरक्षर बसले होते. यामध्ये पुरुष परीक्षार्थीची संख्या ४ हजार ५०९, तर २ हजार ५५६ महिला परीक्षार्थीचा समावेश होता.
दिव्यांग निरक्षरांना मिळाली ३० मिनिटे जास्तनिरक्षर व्यक्तींसाठी जिल्हा परिषद शाळांच्या केंद्रांवर सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० यावेळेत परीक्षा नियोजित होती. ८ दिव्यांगांनी परिक्षा दिली. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी तीन तासांचा होता. मात्र, दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ देण्यात आला. याचा फायदा अनेक दिव्यांगांना झाला.
७,०६५ जणांनी दिली परिक्षाजिल्ह्यात ७,१५२ निरक्षर आजी आजोबांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यापैकी ७,०६५ आजी-आजोबांनी परिक्षा दिली. जिल्हाभरातील जि. प. शाळा व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ही परीक्षा नियोजित होती. यामध्ये संवर्ग तसेच भाषानिहाय वर्गवारीचाही समावेश होता. परिक्षेला ८७ जणांनी दांडी मारली. यात ५९ पुरूषांचा समावेश होता.
"समाजाच्या प्रगतीत सक्षमपणे योगदान देण्यासाठी नवसाक्षरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला."- रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि. प. भंडारा.