लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : गत चार महिन्यांपासून राज्यमार्गावर पालांदूरच्या पुढे दोन ठिकाणी रस्त्याला मोठ्या खाचा पडल्या होत्या. अपघाताला निमंत्रण मिळत होते. या गंभीर विषयाला 'लोकमत'ने वाचा फोडून 'राज्यमार्गावर दोन ठिकाणी रस्त्याला खाचा' या मथळ्याखाली गुरुवारी (दि. १३ फेब्रुवारी) प्रकाशित केले. त्याची तत्काळ साकोली बांधकाम विभागाने दखल घेत शुक्रवारी दोन्ही ठिकाणच्या खाचा भरल्या.
अड्याळ-दिघोरी हा राज्यमार्ग २४ तास सुरू असतो. यावर पालांदूर ते खराशी नाल्याच्या आत दोन ठिकाणी मोठ्या खाचा पडल्याने बरेच अपघात घडले होते. घराजवळील लोकांनासुद्धा भीती निर्माण झाली होती. बच्चेकंपनीला तर सांभाळूनच जावे लागत होते. बांधकाम विभागाने यापूर्वी त्या खाचांत दोनदा मुरूम भरला होता, परंतु उपयोग झाला नाही. ही समस्या 'लोकमत'च्या माध्यमातून बांधकाम विभाग, साकोली यांनी हेरली व समस्या सोडविली.
नागरिकांकडून कौतुकराज्यमार्गावरील खाच भरण्याला मोठा खर्च नसल्याने अभियंता कृष्णा लुटे व उपविभागीय अभियंता दीनदयाल मटाले यांनी प्रयत्न करीत मिळेल तिथून गिट्टी व डांबर आणून खाच भरली. त्यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले. याच रस्त्यावर नाल्याच्या पुढे व खराशी गावाच्या जवळ ५०० मीटर रस्ता पूर्णतः उघडला आहे. यावरसुद्धा तात्पुरत्या स्वरूपात डागडुजीची नितांत गरज आहे. शक्य ते प्रयत्न करून पालांदूर ते खराशी हा ४ किमीचा रस्ता सुरळीत करावा, अशी अपेक्षा आहे.
रस्ते निधीच्या प्रतीक्षेतलोकप्रतिनिधींनी ग्रामीण अंतर्गत रस्त्यांचे झालेले बेहाल डोळाभर बघावे. दुरुस्तीकरिता तत्परतेने निधीची व्यवस्था करावी; परंतु निधीच नसेल तर अधिकारीवर्ग काम कसा करेल, असा प्रश्न सहाजिक पुढे येतो. सध्या बरीच कामे निधीअभावी 3 प्रलंबित आहेत. पालांदूर व परिसरातील बरेच ग्रामीण रस्ते उघडलेले आहेत. त्यांना निधीची व्यवस्था मिळणे गरजेचे आहे. परंतु निधी मिळत नसल्याने नागरिकांना विविध हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
४ किमी लांबीचा पालांदूर ते खराशी रस्ता नादुरुस्तलाखनी तालुक्यातील खराशी जवळील ५०० मीटर रस्ता नादुरुस्त आहे. त्याचप्रमाणे पालांदूर ते खराशी ४ किमी लांबीचा रस्ता ठिकठिकाणी उखडलेला आहे.
"रस्त्यावरील खाच भरल्याने आम्हा नागरिकांना थोडे सहकार्य मिळाले. घरी दिवस-रात्र लहान मुले असतात. त्या खाचेतून वाहने उसळत असल्याने अपघाताची भीती होती. ती तात्पुरत्या स्वरूपात दूर झाली."- सतीश हजारे, पालांदूर.