प्रशांत देसाई भंडाराजिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या एक लक्ष ९७ हजार १६० विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, तर ६३ हजाार ४२३ विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे. पुढील सत्रात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश मिळावा, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सर्व शिक्षा अभियानचा मानस आहे.सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदच्या ७९९ शाळा व नगरपालिकेच्या ३० शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्यात येणार आहे. यात विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही. याबाबत सर्व शिक्षा अभियानाकडून शासनाकडे पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. शैक्षणिक सत्र २०१५-१६ साठी सर्व शिक्षा अभियान विभागाने जिल्हा परिषदच्या एक लक्ष२९ हजार ७३० विद्यार्थी व सेमी इंग्रजीच्या ६७ हजार ४३० अशा एक लक्ष ९७ हजार १६० विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप होणार आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत सात लक्ष ५३ हजार ८८० पाठ्यपुस्तके तर तीन लक्ष २२ हजार ९८० स्वाध्यायपुस्तीकांची मागणी शासनाकडे केले आहे. यात मराठी, हिंदी, उर्दु माध्यमाच्या विद्यार्थ्यांना बालभारती, गणित, माय इंग्लिश बुक, परिसर अभ्यास, हिंदी सुलभभारती, मराठी-हिंदी सुगमभारती, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, स्वाध्यायपुस्तिकांचा समावेश आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकासोबत गणवेशाचे मोफत वाटप होणार आहे. याचा लाभ शासकीय, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. यात सर्व प्रवर्गातील मुली तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व बीपीएल पालकांच्या मुलांना गणवेशाचा लाभ मिळणार आहे. मोफत गणवेशाचा लाभ जिल्ह्यातील ६३ हजार ४२३ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यापूर्वी शैक्षणिक सत्र आरंभ झाल्यानंतर एक किंवा दोन महिन्यानंतर, तर कधी-कधी तर अर्धे शैक्षणिक सत्र झाल्यानंतर पाठ्यपुस्तके दिली जात होती. शालेय गणवेशाच्या बाबतीतही स्थिती फारशी वेगळी नव्हती. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, म्हणून शासनाकडून कडक पावले उचलण्यात आली असतानाही वर्षाअखेर पर्यंत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले आहेत. पाठ्यपुस्तके आणि गणवेशाची वेळेवर वाटप न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची शिफारसदेखील शासनाकडे करण्यात आली आहे. आगामी शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वेळेवर पाठ्यपुस्तके व गणवेश मिळतील, याचे नियोजन शिक्षण विभाग व सर्व शिक्षा अभियानकडून केले जात आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके, गणवेश मिळणार आहेत. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
दोन लक्ष विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके
By admin | Updated: April 25, 2015 00:40 IST