मानेगाव बाजार : निसर्गाने जनतेकडे पाठ फिरविल्यामुळे वरुणराजा शेतकऱ्यांवर अवकृपा करीत आहे. शेतकऱ्यांनी १०० टक्के धानाची पेरणी केली. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पऱ्हे करपली असून शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यातून काही प्रमाणात पऱ्हे जगविण्यासाठी शेतीला तत्काळ पाण्याची नितांत गरज आहे.भंडारा तालुक्यातील टेकेपार उपसा सिंचन अंतर्गत जवळपास सात हजार हेक्टर ओलिताची शेती असून परिसरातील शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली आहे. १५ दिवस लोटूनही निसर्गाच्या अवकृपेमुळे पाणी न आल्यामुळे शेतकऱ्यांचे पऱ्हे वाळू लागले आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन टेकेपार उपसा सिंचन विभागाच्या अभियंत्यांनी त्वरित पाणी सोडून शेतकऱ्यांचे पऱ्हे वाचवावे यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भंडारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते धावून आले. त्यांनी टेकेपार उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता यांना शेतकऱ्यांची १०० टक्के धानाची करपलेली पऱ्हे जिवंत ठेवण्यासाठी उपसा सिंचन कालव्याचे पाणी तात्काळ सोडण्याविषयी निवेदन दिले. कालव्याचे पाणी तत्काळ न सोडल्यास मानेगाव, बोरगाव, सिल्ली, टेकेपार, तिड्डी, मकरधोकडा, गराडा, मेंढा, झबाडा, जाख, बासोरा, गराडा, दवडीपार, येथील शेतकऱ्यांच्या वतीने ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. टेकेपार उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यासाठी तालुका राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष ईश्वर कळंबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव नरेश डहारे, माजी जि.प. उपाध्यक्ष दीपक गजभिये, पं.स. सदस्य रामेश्वर चांदेकर, महेश ढोमणे, विनोद साठवणे, सुनील माकडे, केशव रंगारी, दयानंद नखाते, संतोष हटवार व दिवाकर क्षीरसागर हे कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
टेकेपार उपसा सिंचनचे पाणी सोडा
By admin | Updated: July 1, 2014 23:21 IST