राजकुमार मुळचे लाखांदूर तालुक्यातील. लहानपणापासूनच त्यांना कथा लेखन, कविता लेखन व विविध प्रकारच्या लिखाणाची आवड. गीतकारदेखील असून, नजीकच्या गोंदिया जिल्ह्यात सैनिकी शाळेत ते शिक्षक आहेत. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी देशात सर्वत्रच लॉकडाऊन करण्यात आले. शाळा, महाविद्यालये बंद पडली. शाळेत जावे लागते. पण विद्यार्थी नसल्याने शिक्षणाचे धडे ऑनलाईनच गिरवावे लागत होते. अशातच अंगातील कलागुणांना वाव मिळाला व त्यांनी त्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देण्याचा पण आखला.
त्यानुसार त्यांनी झाडे लावा झाडे जगवा हे गीत लेखन केले तर बैजु या लघुपटाची निर्मिती केले. ते स्वत: या लघुपटाचे निर्माता, लेखक, दिग्दर्शक व गीतकार आहेत. त्यांनी या लघुपटाच्या चित्रीकरणासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील निवडक ठिकाणे निवडली व त्यातून पर्यावरणाचा संदेश दिला. सदर लघुपटाचे चित्रीकरण करतांना त्यांनी शासन नियम व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत हे चित्रीकरण पार पाडले.
सदर लघुपटाचे झाडे लावा झाडे जगवा हे गीत रिलीज झाले असून, येत्या १४ एप्रिल रोजी त्यांचा बैजु लघुपट रिलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. लाखांदूर तालुक्यातील एका युवकाने लॉकडाऊन काळातील वेळेचा सदुपयोग करीत पर्यावरणाचा संदेश दिल्याने तालुक्यात सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात असून त्यांचे गीत प्रचंड व्हायरल होत आहे.