विखे पाटील : दिघोरी, सिल्ली, अड्याळ, खापा येथे सभादिघोरी / सिल्ली : केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे धनदाडग्यांचे सरकार आहे. शेतकरी शेतमजुरांच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ भंडारा जिल्ह्यात आले असता ते बोलत होते. यावेळी त्यांच्या दिघोरी (मोठी), किन्ही (पिंडकेपार), अड्याळ, सिल्ली, खमारी (मोठी), खापा येथे त्यांच्या जाहीरसभा झाल्या. यावेळी मंचावर बाला बच्चन, माजी आमदार सेवक वाघाये, प्रसन्न चकोले, लता हत्तीमारे, गुलाब कापसे उपस्थित होते. राज्य व केंद्र सरकारवर टीका करुन ते म्हणाले, राज्य सरकार मनेरगा, योजना बंद करणार असुन सहा महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांना पैसे दिले नाही. धानाला भाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अच्छे दिन कुठे गेले असा प्रश्न करुन शेतकरी, शेतमजुरांना रसातळाला नेणाऱ्या सरकारला धडा शिकवा. ‘कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा’ असा टोलाही राज्य सरकारला लगावला.भाजपचे मंत्री बोगस पदवी मिळवून करुन फसवणूक करीत असून देशात जातीय तेढ निर्माण करीत आहे, त्यांना धडा शिकवा, असा आरोपही पाटील यांनी केला. आभारप्रदर्शन रमेश फुंडे यांनी केले. (वार्ताहर)
शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांना धडा शिकवा
By admin | Updated: June 29, 2015 00:48 IST