संतोष जाधवर
भंडारा : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराने जमिनीचा पोत बिघडण्यासोबतच मानवी आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत एका शेतकऱ्याने विषमुक्त शेतीचा ध्यास घेतला. स्वत: आपल्या शेतात प्रयोग करून इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन केले. आज या शेतकऱ्याच्या विषमुक्त शेती प्रयोगावर महाराष्ट्र शासनानेही शिक्कामोर्तब केले. कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार घोषित करून या शेतीपद्धतीचा गौरव केला. सेंद्रिय शेतीतून विकासाचा मंत्र देणारा हा शेतकरी आहे, भंडारा तालुक्यातील चिखली येथील तानाजी गोपाल गायधने.
महाराष्ट्र राज्य कृषी, कृषी संलग्नित क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना २०१८ व २०१९ या वर्षाचे पुरस्कार बुधवारी घोषित झाले. यात भंडारा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यात चिखली येथील गोपाल गायधने यांना सेंद्रिय शेतीसाठी कृषिभूषण पुरस्कार घोषित झाला आहे. या पुरस्कारामागे त्यांची प्रचंड मेहनत, चिकाटी आणि इतर शेतकऱ्यांना सामावून घेण्याची क्षमता महत्त्वाची ठरली आहे. २०१४ पूर्वी गायधने यांनी सेंद्रिय शेतीचा ध्यास घेतला. आपल्या गावातच गटाची स्थापना केली. ५० जणांचा शेतकरी गट तयार करून सेंद्रिय शेतीचे धडे घेण्यास सुरुवात केली. आत्मा अंतर्गत झालेल्या प्रशिक्षणात ब्रह्मदे जीवनामृत दशपर्णी अर्क तयार केला. त्यानंतर गांडूळ खतनिर्मिती करून सेंद्रिय शेतीसाठी काय करता येईल याची माहिती मिळविणे सुरू केले. राज्यातच नव्हे तर बाहेरील राज्यातही अभ्यास दौरा करून त्यांनी सेंद्रिय शेतीबाबत अद्यावत ज्ञान संपादित केले.
उत्पादन खर्च कमी आणि कीड नियंत्रणासाठी अल्प खर्च यामुळे त्यांचा हा प्रयोग यशस्वी होऊ लागला. इतर शेतकरीही त्यांचे मार्गदर्शन घेऊ लागले. शेतीला पूरक म्हणून त्यांनी रोपवाटिका उभारली. सौरऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या समस्येवर मात केली. फळबाग लागवड योजनेतून शेतात फळझाडांची लागवड केली. आंबा, चिकू, शेवगा आज त्यांच्या शेतात डोलत आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळून सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त शेती करून त्यांनी भंडारा जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण केला. त्याचाच शासनाने आता गौरव केला आहे.
बाॅक्स
अभ्यासदौऱ्यातून मिळविली माहिती
सेंद्रिय शेती मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांनी आपल्या सहकारी शेतकऱ्यांसोबत विविध ठिकाणचे दौरे केले. त्यात जळगाव, नाशिक, उरळीकांचन येथे जाऊन प्रत्यक्ष माहिती घेतली. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत राष्ट्रीय जैविक कृषी संस्था सिक्कीम येथे सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतले. त्याचसोबत रायपूर, हरिद्वार येथेही प्रशिक्षण घेतले. त्यांनी ही बाब आपल्यापुरतीच मर्यादित न ठेवता शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांनाही प्रशिक्षणात सहभागी करून घेतले.
कोट
शेतातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी एकात्मिक कीडरोग नियंत्रण आवश्यक आहे. आमच्या शेतात भाजीपाला व इतर पिकांमध्ये पक्षी थांबे तयार केले. औषधी वनस्पतीचा वापर करून दशपर्णी अर्क जीवनामृत तयार करून फवारले. एकीकडे खर्चात बचत झाली, तर दुसरीकडे जमिनीचा पोत सुधारला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषमुक्त अन्न तयार करण्यास हातभार लागला. कृषी विभागाचे मिळणारे मार्गदर्शनही आम्हाला मोलाचे ठरले.
- तानाजी गायधने, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त