लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजनेचा लाभ घेतल्यास महिन्याला ९ हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळू शकतो. या योजनेअंतर्गत तरुणांना उद्योगांमध्ये अप्रेंटिस म्हणून प्रशिक्षण दिले जाते. त्यातून त्यांना हे ज्ञान उपयुक्त ठरते.
उद्योगही या पोर्टलद्वारे अप्रेंटिसची निवड करतात. नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम ही तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि उद्योगांना बळकटी देण्यासाठी एक प्रभावी पाऊल आहे. ही योजना 'स्किल इंडिया' उपक्रमाचा एक भाग असून, भारतातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. अधिक माहिती हवी असेल, तर वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
काय आहे योजना?नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (NAPS) ही भारत सरकारने सुरू केलेली एक योजना आहे. तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या रोजगार क्षमतेत वाढ करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. ही योजना १९ ऑगस्ट २०१६ रोजी सुरू झाली. या योजनेचा मुख्य उद्देश उद्योग आणि तरुणांमधील दरी कमी करणे हा आहे. या योजनेतून अप्रेंटिसशिपला प्रोत्साहन दिले जाते, त्यामुळे तरुणांना कामाचा अनुभव मिळेल.
पात्रतेसाठी अटी काय ?ही योजना १४ वर्षांवरील तरुणांसाठी आहे, ज्यांनी किमान ५ वी पास केली आहे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतले आहे, ते या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. याशिवाय आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येतो.
या संकेतस्थळावर करा अर्जया योजनेचा लाभघेण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पोर्टल apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. या ठिकाणी शिक्षण, कौशल्य आणि आवडीनुसार अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू शकतात.