पुरुषांनो सांभाळा ! महिलांपेक्षा पुरुषच अधिक कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 05:00 AM2021-05-17T05:00:00+5:302021-05-17T05:00:42+5:30

जिल्ह्यात महिलांपेक्षा पुरुषच अधिक पाॅझिटिव्ह असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसत आहे. ५७ हजार १७६ बाधितांपैकी तब्बल ३३ हजार २२२ पुरुष आणि २३ हजार ९५४ महिलांना कोरोनाची बाधा झाली. पुरुषांची टक्केवारी ५८.१० तर महिलांची टक्केवारी ४१.९० टक्के आहे. त्यामुळे पुरुषांनो, बाहेर जाताना सावधान ! स्वत:साठी नाही तर कुटुंबासाठी तरी सर्व नियमांचे पालन करा. भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. सध्या रुग्णसंख्या वेगाने घटत असली तरी धोका मात्र कायम आहे.

Take care men! Men are more corona positive than women | पुरुषांनो सांभाळा ! महिलांपेक्षा पुरुषच अधिक कोरोना पाॅझिटिव्ह

पुरुषांनो सांभाळा ! महिलांपेक्षा पुरुषच अधिक कोरोना पाॅझिटिव्ह

Next
ठळक मुद्दे५८.१० टक्के पुरुष, तर ४१.९० टक्के महिलांना कोरोनाची बाधा

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घरातील कर्त्या पुरुषावर असते. कोणतेही संकट असले तरी पुरुषाला बाहेर पडावेच लागते. कोरोनाच्या संकटातही चरितार्थासाठी कामधंद्याला गेल्याशिवाय भागत नाही. योग्य खबरदारी घेतली नाही की मग कोरोनाचा संसर्ग होतो. जिल्ह्यात महिलांपेक्षा पुरुषच अधिक पाॅझिटिव्ह असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसत आहे. ५७ हजार १७६ बाधितांपैकी तब्बल ३३ हजार २२२ पुरुष आणि २३ हजार ९५४ महिलांना कोरोनाची बाधा झाली. पुरुषांची टक्केवारी ५८.१० तर महिलांची टक्केवारी ४१.९० टक्के आहे. त्यामुळे पुरुषांनो, बाहेर जाताना सावधान ! स्वत:साठी नाही तर कुटुंबासाठी तरी सर्व नियमांचे पालन करा. 
भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. सध्या रुग्णसंख्या वेगाने घटत असली तरी धोका मात्र कायम आहे. २७ एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधिताची नोंद झाली. तेव्हापासून रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र एप्रिल महिन्याने सर्वांना भयभीत करून टाकले होते. या महिन्यात सुमारे ३३ हजारांवर व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार १७६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे. विविध कामांच्या निमित्ताने घराबाहेर पडावेच लागते. कामधंदा शोधताना कुठे ना कुठे संपर्क येतो आणि त्यातून मग कोरोनाचा संसर्ग होतो. यापेक्षाही दुसरे कारण म्हणजे अनेक जण बेफिकिरीने वागताना दिसून येतात. मास्क न घालणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, आपल्याला कोरोना होऊच शकत नाही, असा अतिआत्मविश्वास अनेक पुरुषांमध्ये दिसून येतो. याउलट महिला सर्व नियमांचे पालन करतात. अगदी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडतात. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करतात. फाजिल आत्मविश्वास बाळगत नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये भंडारा जिल्ह्यात तरी कोरोनाचे प्रमाण कमी दिसून येत आहे. 
वयोगटानुसार विचार केल्यास २१ ते ३० आणि ३१ ते ४० या वयोगटातच सर्वाधिक पुरुष कोरोनाबाधित असल्याचे दिसून येते. २१ ते ३० वयोगटात ६,६१३ आणि ३१ ते ४० वयोगटात ७,३४३ पुरुष पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. घरच्या कर्त्या पुरुषाला कोरोना झाल्यास कुटुंबाचे काय होते याची उदाहरणे आसपास दिसत आहेत. कोरोना उपचारासाठी झालेला अवाढव्य खर्च कुटुंबाला दहा वर्षे मागे घेऊन जातो. दुर्दैवाने कर्ता पुरुष गमावला तर संपूर्ण कुटुंब उघड्यावर येण्याची भीती असते. 
गत आठ-दहा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. मृतांचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे पुन्हा अनेक जण बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. कोरोना संपला नाही त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. खासकरून पुरुषांनी आणि त्यातही तरुणांनी कोरोनाला सहज घेऊ नये.

भंडारा तालुक्यात आज एकही मृत्यू नाही
- जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद भंडारा तालुक्यात झाली आहे. दररोज मृत्यूची नोंद तालुक्यात होत होती. गेल्या कित्येक दिवसांपासून दररोज मृतांचा आकडा वाढत होता. मात्र, रविवार दिलासा देणारा ठरला. तालुक्यात रविवारी कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १०२० व्यक्तिंचा कोरोनाने बळी घेतला. त्यात भंडारा ४७९, मोहाडी ९२, तुमसर १११, पवनी १००, लाखनी ९०, साकोली १००, लाखांदूर ४८ व्यक्तिंचा समावेश आहे. 

९६ व्यक्ती पाॅझिटिव्ह
- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. रविवारी जिल्ह्यात ९६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या, तर ५१६ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. चौघांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत ५३ हजार २६१ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रविवारी २०३२ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ४०, मोहाडी २, तुमसर ९, पवनी १२, लाखनी ५, साकोली २५ आणि लाखांदूर तालुक्यात ३ अशा ९६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात चौघांचा मृत्यू झाला असून, त्यात तुमसर, साकोली तालुक्यातील प्रत्येकी १, तर लाखनी तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला. 

 

Web Title: Take care men! Men are more corona positive than women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.