आर्थिक साक्षरता अभियान : रामचंद्र अवसरे यांचे आवाहनपवनी : केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री जनधन योजना सुरु झाली. जीवनाच्या सुरक्षिततेकरिता शासनाच्या या व अन्य योजनांचा लाभ घ्यावा. यामुळे आपल्याला सुखाची झोप लागेल. सामाजिक गरिबी दूर करण्याकरिता शासनाचा विमा पेंशन योजना व अन्य योजनांतर्गत प्रत्येक व्यक्तीने स्वत:चा विमा उतरविणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या सर्व नवीन योजना बँकेमार्फत राबविल्या जात आहे. या योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या आर्थिक साक्षरता अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा रजनी मोटघरे, बँकेचे क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र डुमरे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अशोक पारधी, शाखा प्रबंधक परमानंद नरोले उपस्थित होते. याप्रसंगी प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत सुनिता मेघरे यांच्या पतीच्या अपघाती निधनामुळे त्यांना २ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.नगराध्यक्षा रजनी मोटघरे यांनी समाजातील श्रीमंत व गरीब यातील दरी कमी करण्याच्या दृष्टीने बँकेनी उत्कृष्ट कार्य करावे. समाजातील आर्थिक विषमता नष्ट करण्याकरिता प्रधानमंत्री जनधन योजनेचा जनतेनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अशोक पारधी यांनी समाजातील भ्रष्टाचार नष्ट करण्याकरिता भ्रष्टाचार करणार नाही, असा निर्धार करावा. असे जरी प्रत्येकाने ठरविले तरी भ्रष्टाचारात आळा बसू शकतो. त्याकरिता जनजागृतीची आवश्यकता आहे. भंडारा, नागपूर व गोंदिया जिल्ह्यातील जनतेला सर्वतोपरी मदत करून शासनाच्या योजना पोहचविण्याचा बँक प्रयत्न करीत असल्याचे क्षेत्रीय प्रबंधक डुमरे म्हणाले. प्रास्ताविक बँकेचे शाखा प्रबंधक परमानंद नरोले यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन बँकेचे अधिकारी धनंजय खंडेरा यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
शासनाच्या विमा योजनेचा लाभ घ्या
By admin | Updated: November 2, 2015 00:48 IST