मोहाडी : निराधार वृध्द व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक व आजारग्रस्त, निराधार विधवा, देवदासी, परित्यक्त्या आदी दुर्बल घटकांचे विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत विविध योजनांमधून मासिक अर्थसहाय्य मजुरीचे अधिकार आता शासनाने तहसिलदारांना दिले आहेत. अर्ज प्राप्त होताच एका महिण्याच्या आत प्रकरण निकाली काढावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत.विशेष सहाय्य कार्यकर्त्यांतर्गत नियमित संजय गांधी योजना समिती गठित झाल्या नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित पडले आहेत. याचा विचार करुन शासनाने ज्या तालुक्यामध्ये नियमित संजय गांधी योजना समिती गठीत झालेल्या नाहीत तेथे उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते. तथापि, उपविभागीय अधिकारी महसूल यांना त्यांच्या कार्यामुळे समितीच्या बैठका वेळेवर घेण्यात येत नव्हत्या. त्यामुळे लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहत होते. आता उपविभागीय अधिकारी महसुल यांचे अध्यक्षतेखाली सदर समिती बरखास्त करुन लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार तहसिलदार यांना देण्यात आले आहे. संबंधित तहसिलदार यांना लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यावर आवश्यक ती तर्फे चौकशी करुन योजनेच्या निकषांच्या अधिन राहून एका महिण्याच्या कालावधीत सर्व अर्ज निकाली काढण्यात यावे अश्या सुचना महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. (शहर प्रतिनिधी)
अर्ज मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना
By admin | Updated: May 16, 2015 01:05 IST