प्रकरण आश्रमशाळा विद्यार्थीनीच्या आत्महत्येचेतुमसर : खापा येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थीनी नेहा उईके हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणात गैरव्यवस्थापनाचा ठपका अधीक्षिका व मुख्याध्यापकावर ठेवून त्यांना प्रकल्प अधिकारी, भंडारा यांनी शुक्रवारी निलंबित केले. या आश्रमशाळेत व वसतीगृहात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याची ओरड आहे.शनिवारी येथील आठव्या वर्गात शिकणारी नेहा उईके रा. कारली हिने वसतीगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती. मंगळवारी प्रकल्प अधिकारी मडावी यांनी आश्रमशाळेला भेट दिली. आमदार चरण वाघमारे यांनी शाळेतील सुविधा व व्यवस्थेवर नाराजी व्यक्त करुन प्रकल्प अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. आ.वाघमारे यांनी आश्रमशाळेची पाहणी करीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मडावी यांनी सलग तीन दिवस येथे चौकशी केली. गैरव्यवस्थापनाचा ठपका ठेऊन अधीक्षीका लकडे व मुख्याध्यापक प्रभाकर चोपकर यांना शुक्रवारी निलंबित केले. आदिवासी संघटनेचे अशोक उईके, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, प्रभा पेंदाम, धुर्वे यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)अधीक्षिका लकडे, मुख्याध्यापक प्रभाकर चोपकर यांचेवर गैरव्यवस्थापनाचा ठपका ठेऊन त्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. याबाबत अप्पर आयुक्तांकडे कार्येत्तर अहवाल सादर करण्यात आला.- हरीराम मडावी,प्रकल्प अधिकारी, भंडारा
अधीक्षक, मुख्याध्यापक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 00:16 IST