तपास सीआयडीकडे : साकोली पोलीस ठाण्यातील दुसरी घटनासाकोली : रविवारच्या रात्री तलाव वाडीत एक इसम रस्त्यावर गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून साकोली पोलिसांनी त्या इसमाला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर रात्री घरी पोहचवत असताना अचानक त्याची प्रकृती बिघडली. पोलिसांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. मंगेश सुकराम लांजेवार (३६) रा. तलाव वॉर्ड साकोली असे मृत इसमाचे नाव आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना इसमाचा मृत्यू झाल्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने हा तपास सीआयडीकडे सोपविला आहे. पोलिसांच्या ताब्यातील इसमाचा मृत्यू होण्याची साकोली पोलीस ठाण्यातील ही दुसरी घटना आहे. मंगेश लांजेवार हा रविवारी रात्री तलाव वॉर्डात गोंधळ घालत आहे, अशी तक्रार पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मंगेशला ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. रात्री १२ वाजताच्या सुमारास त्याची प्रकृती खराब झाल्याने व्हॅनने त्याला घरी सोडून देण्यासाठी पोलीस निघाले. मात्र त्याच्या घराला कुलूप असल्याने पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मंगेशच्या मृत्यूची माहिती साकोली पोलिसांनी रात्रीच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातच ठेवले. सकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम साळी हे साकोली पोलीस ठाण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाला देण्यात आला. दुपारी हाच तपास सीआयडीला सोपविण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)पोलिसांची भूमिका संशयास्पद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश पोलीस ठाण्यात असतानाच त्याची प्रकृती खराब झाली. तेव्हा पोलिसांनी त्याला रूग्णालयात नेण्याऐवजी त्याच्या घरी नेले व घरी कुणीही नसल्याचे कारण सांगू त्याला रूग्णालयात नेले. त्याला सरळ रुग्णालयात नेले असते तर त्याचा जीव वाचू शकला असता.शवविच्छेदन नागपूरला !मंगेश लांजेवार यांचा पोलिसांच्या ताब्यात संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येणार आहे.
पोलिसांच्या ताब्यातील इसमाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2016 00:26 IST