यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यात एकूण ६ हजार ९५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली. त्याअंतर्गत जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्र इटियाडोह बांध सिंचन सुविधेअंतर्गत सिंचित केेले जाणार होते. मात्र तालुक्यातील काही भागांत उन्हाळी धानपिकाची कापणी सुरू करण्यात आली आहे, तर काही भागांत धानपीक कापणीला आणखी काही दिवस असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील काही पाणी वापर संस्थांअंतर्गत काही दिवसांपूर्वीच इटियाडोह बांधअंतर्गत पाण्याचा विसर्ग बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार इटियाडोहअंतर्गत १० मे रोजी कालव्याने येणारे पाणी बंद करण्यात आले. कालव्याचे पाणी बंद करण्यात आल्याने तालुक्यातील बारव्हा परीसरातील बारव्हा, मानेगाव, मुरमाडी, बोरगाव, कोच्छी, दांडेगाव, चिचोली, दहेगाव आदी गावांतील जवळपास २०० हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी धानपीक एका पाण्याअभावी संकटात सापडल्याने या भागातील शेतकऱ्यांत चिंता व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कालव्याचे पाणी बंद झाल्याने बारव्हा परिसरातील शेतकऱ्यांच्या धानपिकाला पाणी सोडण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
बॉक्स
तोंडी आलेला घास हिरावण्याची शेतकऱ्यांना भीती
लाखांदूर तालुक्यातील काही भागांतील उन्हाळी धानपीक कापणीला सुरुवात झालेली आहे. तर काही भागांत धानपिकाला एका पाण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील बारव्हा परिसरातील बारव्हा, मानेगाव, मुरमाडी, बोरगाव, कोच्छी, दांडेगाव, चिचोली, दहेगाव आदी गावांतील धानपिकाला एका पाण्याची आवश्यकता असून, ईटियाडोह सिंचन सुविधेअंतर्गत पाणी बंद करण्यात आल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला जाईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या धानपिकाला तत्काळ पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदनातून करण्यात आली आहे.