मासळ : पाणी त्याची बाणी अशी म्हण सर्वांना ऐकिवात आहे. पाणी असेल तर सर्व काही सोपस्कार होते पण पाणी नसेल तर मानव प्राण्याला दाही दिशा भटकावे लागते. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी व इतर नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. निसर्ग आपणास सर्व काही देते पण नियोजनाच्या अभावामुळे आपण बऱ्याच समस्यांना सामोरे जातो. असाच एक उपक्रम प्राचार्य जी.एन. टिचकुले यांच्या नियोजनातून पुढे आलेला आहे.सुबोध विद्यालयात सुमारे ९०० विद्यार्थी विद्यार्जन करतात व माध्यान्ह भोजन व पिण्याचे पाणी यांचा उपयोग घेतात. परंतु बहुतांश पाणी वाया जात होते. दररोज दिड ते दोन हजार लिटर पाणी सांडपाणी वाया जात असताना त्याचा उपयोग करता येईल काय, यावर विचार सुरू होता. त्या पाण्याचा उपयोग शालेय परिसरातील फुलझाडे व इतर झाडांना होण्याच्या दृष्टीने तो पाणी एका १० बाय ५ फुटांच्या टाकीत साठवून विद्यार्थ्यांच्या मदतीने झाडांना दिला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्वसुद्धा कळू लागले. दररोज शाळा सुटण्यापूर्वी दिवसभराचा सांडपाणी टाकीत जमा करून नंतर त्याचा वापर झाडांना करतात. यामुळे विहिरीतील पाण्याची पातळी कायम राखण्यास मदत झाली आहे व पाणी समस्येवर मात सुद्धा करता आली. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाण्याचा पुर्नवापर कसा करावा व स्वत:च्या घरी सुद्धा याचा वापर कशाप्रकारे योग्यरित्या करता येईल याबाबत प्राचार्य टिचकुले नेहमीच मार्गदर्शन करतात. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांनी राबविला पाणी पुनर्वापर उपक्रम
By admin | Updated: October 9, 2014 22:58 IST