ग्लोबल नेचर क्लबचा उपक्रम : ३०० किलो संकलनाचा करणार निर्माल्यखत
साकोली : येथील कृष्णमुरारी कटवार हायस्कूलमधील राष्ट्रीय हरित सेनेतंर्गत जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबच्या आजी व माजी नेचर क्लब सदस्य विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकरिता प्रत्यक्ष कृती करून विविध तलावावर शेकडो किलो निर्माल्य गोळा केला.गणेश विसर्जनाच्या दिवशी अनेक मंडळाकडे अगोदरच संपर्क साधून ग्लोबल नेचर क्लबच्या सदस्य विद्यार्थ्यांनी विविध मुर्तीजवळचे दररोज वाहिले जाणारे हार, फुले, नारळ, पाने, दुर्वा, तोरणे आदी जैविक साहित्य अर्थात निर्माल्य नेचर क्लबचे संघटक प्रा. अशोक गायधने यांच्या मार्गदर्शनाखाली नेचर क्लबच्या गार्डनमध्ये जमा केला.शुभम बघेल व बाळकृष्ण मेश्राम हे पाच-सात वर्षापुर्वीचे ग्लोबल नेचर क्लबचे माजी विद्यार्थी मागील सहा सात वर्षापासून सातत्याने विविध गणेश मंडळाकडून निर्माल्य गोळा करीत असतात. वर्षभर हे सर्पमित्र तसेच पर्यारणाच्या विविध उपक्रमासाठी हातभार लावीत असतात. शुभम बघेल हा गणेश विसर्जनाच्या दोन दिवस तलावावर सायंकाळी ४ वाजेपाून रात्री २ वाजेपर्यंत आपले मित्र कमलेश टोपले, शहिल शेख, कुंदन मिश्रा, गुणवंत जिभकाटे व होमगार्ड पथकाचे सदस्य यांचे सहकार्याने मागील सहा वर्षापासून गोळा करीत असतात. बाळकृष्ण मेश्राम हा मागील सात वर्षापासून खंडाळा, सावरबंध तसेच साकोलीच्या विविध गणेश मंडळाकडून युवराज खोब्रागडे, सुमित तिडके या विद्यार्थ्यांच्या सहायाने गोळा करीत असतात. या दोघांच्या सात आठ दिवस कार्यरत राहण्याने साकोली व आजुबाजुच्या तलावात शेकडो किलो निर्माल्य अगोदरच जमा करून पाणी प्रदूषित होण्यापासून वाचविण्यात आले. नेचर क्लबचे मिडलस्कुलचे विद्यार्थी रितीक राजेश शोरी याने १५ किलो निर्माल्य विविध घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळाकडून जमा केला.सुरज सुभाष कापगते याने १० किलो निर्माल्य घरगुती गणेश असलेल्या घरून जमा केला. हायस्कूलचा युवराज बोबडे, सुमित तिडके शानिद पठान यांनी ४० किलो निर्माल्य ९ गणेश मंडळाकडे फिरून जमा केला. कौशिक प्रदीप परमार याने ५ किलो निर्माल्य प्रगती कॉलनी सार्वजनिक गणेश मंडळाकडून जमा केला. माजी विद्यार्थ्यांनी ग्लोबल नेचर क्लबचे संघटक अशोक गायधने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले. जमा केलेल्या निर्माल्य संकलनापासून निर्माल्य खत तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत. आगामी शारदोत्सव व नवरात्रोत्सव मधील निर्माल्य संकलन करण्याचा निर्धार या नेचर क्लब सदस्यांनी केला आहे. या निर्माल्य संकलन उपक्रमाचे प्राचार्य प्रकाश मस्के, पर्यवेक्षक हिवराज येरणे, शालिक थोटे, के.पी. बिसेन, संजय पारधी, पुष्पा बोरकर, मनिषा काशिवार, बी.एस. लंजे, संजय भेंडारकर, जागेश्वर तिडके, विठ्ठल सुकारे, सेवक कापगते, अनुराधा रणदिवे, गेडाम, शिक्षिका शीतल साहु, सामाजिक वनिकरण साकोलीचे लागवड अधिकारी बी.आर. भगत यांनी आजी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. (तालुका प्रतिनिधी)