जवाहर चौकात आंदोलन : मुख्याधिकाऱ्यांच्या फोटोला टाकला हार, टँकरने पाणी पुरवठ्याचे आश्वासनतुमसर : मागील काही दिवसापासून तुमसर शहरात गढूळ तथा अत्यल्प पाणीपूरवठा करणे सुरु आहे. याविरोधात शहर भाजयुमो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जवाहर चौकात रास्ता रोको आंदोलन केले. नंरत मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांच्या खुर्चीला निवेदन चिपकवून पुष्पहार अर्पण केला. नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी मागणी केलेल्या प्रभागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.तुमसर शहरात मागील एक ते सव्वा महिन्यापासून पाणी टंचाई सुरु आहे. पंपहाऊस यंत्रात बिघाडामुळे शहरात नियमित पाणीपुरवठा करण्यास नगरपरिषद असमर्थ ठरली आहे. नळाला गढूळ व चिखलमिश्रीत पाणीपुरवठा करणे सुरु आहे. अत्यल्प पाणीपुरवठ्यामुळे सामान्य नागरिक वैतागून गेले आहे. तुमसर शहर भाजयुमो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दूपारी १ वाजता जवाहर चौकात रास्ता रोको आंदोलन केले. नंतर निवेदन देण्याकरिता भाजप पदाधिकारी गेले तेव्हा मुख्याधिकारी अनुपस्थितीत होते. तेव्हा पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खूर्चीला पुष्पहार घालून मागण्याचे निवेदन चिकटविले. नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी मागणी केलेल्या प्रभागात टँकरने पाणी पूरवठा करण्याचे लिखीत आदेश दिले. शहरातील नेहर नगर व शिवनगर परिसरात तीव्र पाणी टंचाई आहे. या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी , जिल्हा महिला भाजपाध्यक्षा कुंदा वैद्य, माजी नगराध्यक्ष गीता कोंडेवार, कविता शर्मा, भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम लांजेवार, प्रदीप पडोळे, कैलाश पडोळे, दिपक साकुरे, अनिल साठवणे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
तुमसरात भाजपचे रास्ता रोको आंदोलन
By admin | Updated: July 30, 2016 00:19 IST