सांगली : महापौर विवेक कांबळे यांनी आज, गुरुवारी मुख्यालयातील लेखा, सुवर्णजयंती, प्रभाग समिती एकच्या कार्यालयांना अचानक भेट देऊन कर्मचारी, अधिकाऱ्यांची ‘हजेरी’ घेतली. हजेरीपत्रक, हालचाल नोंदवहीची तपासणी करून खातेप्रमुखांना धारेवर धरले. या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १७ कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे उघडकीस आले. यात प्रभाग समिती एकचे आप्पा हलकुडे, बी. आर. पांडव, जे. जे. जाधव, एच. ए. दीक्षित अशा बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याबरोबरच ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजाविण्याचे आदेशही कांबळे यांनी दिले. महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून कांबळे यांनी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच काम करण्याची सक्ती केली आहे. प्रशासकीय वेळेपेक्षा जादा वेळ कार्यालयात थांबणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांनी अनेकदा बाहेर काढले आहे. त्यातून आयुक्त उपायुक्तसोबत संजय मेंढे, किशोर जामदार हेही सुटलेले नाहीत.
महापौरांकडून ‘स्टिंग आॅपरेशन’
By admin | Updated: February 13, 2015 01:06 IST