भंडारा : गावापासून दुरवरच्या ठिकाणी अनेकजण नोकरी, उद्योगव्यवसाय, शिक्षणसाठी गेलेले आहेत. अशा सर्वांची दिवाळी या मुख्य सणाला गावाकडे येण्याची असलेली इच्छा लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त जादा बसेस सोडण्यात येत आहे. पुणे व मुंबईकडील व्यक्तींना गावाकडे येता यावे, यासाठी भंडारा परिवहन विभागानेही पाऊल उचलले आहे. भंडार-पुणे व पुणे-भंडारा अशा प्रवासाकरिता नऊ बसेस सोडण्यात येणार आहेत.भंडारा जिल्ह्यातील अनेकांनी गाव सोडल्याशिवाय स्वत:ची प्रगती नाही, अशी खुणगाठ मनाशी बांधुन जिल्हा सोडला आहे. यातील अनेकजण पुणे व मुंबई येथे शिक्षणासाठी गेलेले असून काही नोकरी, उद्योगधंदा करण्यासाठी गेले आहेत. हे सर्व मुख्य सण असलेल्या दिवाळीनिमित्त गावाकडे काही दिवसांकरिता येत असतात. वर्षातून एकदाच हे सर्व गावाकडे येत असल्याने त्यांना प्रवासादरम्यान होणाऱ्या संकटांचा सामना करावा लागू नये, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने याची दखल घेतली आहे.'लोकवाहिनी' अशी ओळख असलेल्या रापमच्या बसेसने आजही अनेकजण सुरक्षित प्रवासावर विश्वास ठेवून बसने प्रवास करतात. अनेक खासगी बसेस मार्गावर धावत असल्या तरी रापमच्या बसेसने जो विश्वास प्रवाशांचा संपादन केलेला आहे. त्याच्या भरोशावर आजही अनेकजण खासगी बसने प्रवास करणे टाळतात. अशा विश्वास संपादन केलेल्या रापमने 'दिवाळी हंगामात' पुणे व मुंबईकडील नागरिकांना गावाकडे येणे सोयीचे व्हावे, यासाठी भंडारा विभागाने भंडारा-पुणे व पुणे-भंडारा या मार्गावर नऊ निमआराम व परिवर्तन बसेस धावणार आहे. यात भंडारा आगाराच्या ४ निमआराम व एक परिवर्तन बस असून साकोली व तुमसर आगारातील दोन परिवर्तन बसेसचा समावेश आहे.२३ आॅक्टोंबरची दिवाळी असल्याने पुणे येथील नागरिकांना गावाकडे वेळेत पोहचता यावे, यासाठी १८ आॅक्टोंबरला भंडारा येथून निमआराम बस पुणेला रवाना होणार आहे. १८ ते २१ आॅक्टोंबरपर्यंत भंडारा ते पुणे बस उपलब्ध राहणार आहे. तर पुणेवरून भंडाराला १९ ते २२ पर्यंत बसेस उपलब्ध आहेत. भंडारा आगाराव्यतिरिक्त साकोली व तुमसर येथूनही बसेस पुण्याला जाणार आहेत. पुणे येथील इंजीनिअरींग महाविद्यालयाजवळून भंडारा जिल्ह्यासाठी सायंकाळी ५ वाजता बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांना सोयीचे व्हावे यासाठी तिकिटांची आॅनलाईन बुकींग व्यवस्था आहे. (शहर प्रतिनिधी)
राज्य परिवहन महामंडळाची ‘गाव चले हम’ बसफेरी
By admin | Updated: October 11, 2014 01:16 IST