तुमसरात वक्रदृष्टी : पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह तुमसर : तांदळाची प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या तुमसर शहर हे सोन्या-चांदीचे खरेदी-विक्रीचे प्रमुख केंद्र आहे. बुधवारी सकाळी १०.४० वाजाताच्या सुमारास दिवसाढवळ्या दुकानाचे शटर उघडताना सिनेस्टाईलने दुचाकीच्या डिक्कीतून सुमारे ५०० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास करण्यात सराईत चोरटे यशस्वी झाले. केवळ ५० मीटर अंतरावर पाच राष्ट्रीयकृत बँका व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. चोरटे फरार असून पोलीस त्यांच्याा मागावर आहेत. बुधवारी मंगलमूर्ती ज्वेलर्सचे संचालक विवेक सोनी घरून सराफा दुकानाचे शटर उघडून दुचाकीकडे मागे वळताच दुचाकीच्या डिक्कीतून सोन्याची दागिन्यांची बॅग चोरट्यांनी लंपास केली. पोलिसांनी नाकेबंदी केली. परंतु चोरट्यांचा अद्याप सुगावा लागला नाही.वर्षभरापूर्वी तुमसरात सोनी कुटुंबात तिहेरी हत्याकांड घडले होते. आज चोरी झाली. दोघांचेही आडनाव सोनी आहे. तुमसर शहरात मागील आठ महिन्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. आरोपींचा अजुनपर्यंत सुगावा लागलेला नाही. तुमसर शहर चोरट्यांचे आश्रय तर ठरत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.तुमसर पोलीस ठाण्यात पोलीस शिपायांची संख्या कमी आहे. येथे पोलिसांची २० ते २२ पदे रिक्त आहेत. तुमसर शहराची लोकसंख्या ४२ हजार आहे. या ठाण्यांतर्गत ३५ गावे येतात. शहर सांभाळताना पोलिसांना कसरत करावी लागते. येथे पोलिसांना कर्तव्यामुळे रजा सुद्धा कमी मिळतात. रात्रीची गस्त येथे नियमित सुरू आहे. तीन महिन्यात चोरीच्या घटनेत घट झाली होती. परंतु बुधवारी झालेल्या चोरीमुळे पुन्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.केवळ प्रश्नचिन्ह म्हटल्याने होणार नाही. पोलिस कर्मचाऱ्यांनी किती व कसे काम करावे हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो. मंगलदीप ज्वेलर्सच्या बाजूला अन्य दुकाने सुरू होती. मुख्य रस्ता असल्याने वर्दळ होती. परंतु कुणाच नागरिकांचे लक्ष या घटनेकडे गेले नाही. एका चोरट्याने डिक्कीतून बॅग काढली असावी, दुसऱ्या चोरट्याने पसार होण्याकरीता दुसरी दुचाकी सुरूच ठेवली असणार हा प्रकार घडताना कुणाचेही लक्ष गेले नाही. नागरिक स्वत:च्या कामात व्यस्त होते. (तालुका प्रतिनिधी)
चोरींची मालिका सुरूच
By admin | Updated: April 9, 2015 00:39 IST