उन्नत मधमाशीपालन प्रशिक्षण : एस.व्ही.गुढे यांचे प्रतिपादन विरली (बु.) : देशात तामीळनाडूतील मदुराईनंतर महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मधमाशीपालनाचे भरीव कार्य होत आहे. भंडारा जिल्ह्यातील चौरास भागातील वातावरण मधमाशांसाठी पोषक असून येथील वातावरण मधमाशांच्या वसाहतीचे वर्षातून किमान चारदा विभाजन होण्यास उपयुक्त असल्याचे प्रतिपादन खादी ग्रामोद्योगचे प्रशिक्षक एस. व्ही. गुढे यांनी केले. ते येथील ग्रामसचिवालयात आयोजित उन्नत मधमाशीपालन प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते.शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी, ग्रामायण प्रतिष्ठान विरली बु, बी. द. चेंज मुंबई आणि खादी ग्रामोद्योग आयोग नागपूर यांच्या संयुकत विद्यमाने उन्नत मधमाशीपालन प्रशिक्षणांतर्गत राणीमाशी पैदास या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय लेपसे तर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. के.बी. नगरनाईक, डॉ. संभाजी चुटे, गुंडेराव बागडे, विरली बुजच्या सरपंच अर्चना महावाडे, ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव कोरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. खादी ग्रामोद्योग मधमाशी पालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध आहे. यासाठी ग्रामप्रशासनाने गाव पातळीवर मधमाशीपालनाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. याप्रसंगी डॉ. नगरनाईक यांनी मधमाशीच्या जीवन चक्रावर मार्गदर्शन केले. ग्रामायणचे उध्वव कोरे यांनी चौरास भागातील मधमाशीपालन चळवळीचा लेखाजोखा मांडला. यावेळी उमरी चौ. येथील शेतकरी ज्ञानेश्वर हेमणे आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थीनी अस्मिता वाडीभस्मे यांनी मधमाशी पालनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.संचालन शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. बी.एस. रहिले यांनी तर आभार प्रदर्शन मधमाशीपालक अखिल कोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संशोधन सहायक पी.ए. गेडाम, उषाकिरण सुर्यवंशी, राजेश महावाडे, कल्पना ब्राम्हणकर, शेखर शिंगाडे, लेकराम मेंढे, कृणाल टेंभूरकर यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
चौरासचे वातावरण मधमाशीसाठी पोषक
By admin | Updated: March 11, 2016 01:13 IST