भंडारा : गत मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने इतर कर्मचारी संघटनावगळता लिपिकवर्गीय जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने मागण्यांचे पत्र देऊनही सभेकरिता पाचारण करण्यात आले नाही. त्यामुळे समस्या सुटू शकल्या नाहीत. आतातरी लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या व अडचणींची सोडवणूक करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सीईओ डाॅ.एस.के. पानझाडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी विभागीय अध्यक्ष केसरीलाल गायधने, जिल्हाध्यक्ष प्रभू मते, जिल्हा कार्याध्यक्ष मनीष वाहाणे, जिल्हा परिषद युनियन अध्यक्ष महेश इखार, जिल्हा सचिव यशवंत दुनेदार, कार्यकारी सचिव सुधाकर चोपकर, मुख्यालय अध्यक्ष नितेश गावंडे, मुख्यालय सचिव प्रमोद मानकर, कार्याध्यक्ष संजय मुडल्लीवार, अजय जगनाडे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळाने सीईओंशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन सोपविले. यावेळी सीईओ यांनी सकारात्मक चर्चा करून लिपिकवर्गीयांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलाविण्यात येऊन सविस्तर चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याचे सूतोवाच केले.
..अशा आहेत मागण्या
पदोन्नतीच्या कोट्यातील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी, कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना पहिला, दुसरा व तिसरा लाभाची प्रलंबित प्रकरणे मंजूर करण्यात यावी, शासन निर्णयाप्रमाणे बदल्यांचे धोरण राबविण्यात यावे, लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती देण्यात यावी, बदली प्रक्रियेच्या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करावे, लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांपासून होणाऱ्या शाब्दिक हल्ल्यापासून बचाव करण्यात यावा, निलंबन प्रकरणे नियमित करण्यात यावी आदी मागण्यांचा निवदेनात समावेश होता.