तुमसर : ऐतिहासीक पार्श्वभूमी असलेला तुमसर रोड (देव्हाडी) येथील रेल्वे तलावात जल काटेरी वनस्पती, कचरा तथा जलजंतूस मारक ठरला आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहे. रेल्वे तलावाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीच ठोस पावले येथे उचलली नाही.तुमसर रोड (देव्हाडी) येथे मुख्य बाजार चौकात तथा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या मालकीचा ३० ते ३५ एकर परिसरात जुना तलाव आहे. पूर्वी सिंचनाकरिता या तलावाचा उपयोग केला जायचा. सध्या सिंचनाकरिता उपयोग करण्याकरिता रेल्वे प्रशासनाचे खेटे घालावे लागतात. यापूर्वी रेल्वे प्रशासन मासेमारी करीता तलावाचा लिलाव करीत होते. परंतु तलावात जल वनस्पती मोठ्या प्रमाणात उगवल्याने मासे येथे श्वास घेऊ शकत नाही. कोळी बांधवांनी त्यामुळे तलाव कंत्राटी पद्धतीने घेणे बंद केले. काटेरी वनस्पती असल्याने माशांना ते टोचतात. मासेमारी करणाऱ्यांच्या जीवालाही त्याचा धोका आहे. तलावात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. आठवडी बाजाराच्या दिवशी सडका भाजीपाला तलावात भाजीविक्रेते घालतात. विविध प्रकारचे जलजंतू येथे तयार झाले आहेत. सायंकाळी तलावाजवळ कधी कधी दुर्गंधी येते. तलावाच्या दुसऱ्या टोकावर स्टेशनटोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत रेल्वेचे विभागीय अभियंत्याचा बंगला आहे. दररोज ते या मार्गाने ये जा करतात. परंतु त्यांचे या तलावाकडे दुर्लक्ष दिसत आहे. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तथा इतर ज्येष्ठ अधिकारी रेल्वे स्थानक व परिसराची दर सहा महिन्यांनी तपासणी करतात. परंतु तलावाची पाहणी करीत नाही दरवर्षी या तलावाचा सुमारे ४ ते ५ लाखात लिलाव व्हायचा. रेल्वे प्रशासनाला महसूल प्राप्त होत होता. तसेच तलावाची देखभाल व स्वच्छतेकडे कंत्राटदार लक्ष देत होते. परंतु या कंत्राटदारांची कायमची या तलावाकडे पाठ फिरविली आहे.देव्हाडी व स्टेशनटोली ग्रामपंचायतीच्या सीमेत हा तलाव आहे. दोन्ही ग्रामपंचायत भवन तलावाच्या काठाशेजारी आहेत. पदाधिकारी येथे बसून संपूर्ण गावावचे नियोजन व विकास कामे करतात. परंतु दिव्याखाली येथे अंधार दिसून येतो. जरी मालकी रेल्वे प्रशासनाची असली तरी गावाच्या सौंदर्यीकरणात बाधा आणणाऱ्या तलावाचे सौंदर्यीकरण व स्वच्छता करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
ऐतिहासिक रेल्वे तलाव बनले घनकचरा केंद्र
By admin | Updated: April 24, 2015 00:33 IST