खापा शिवारातील प्रकार : ले-आऊट मालकाचा प्रतापतुमसर : तुमसर-भंडारा राज्य मार्गावरील खापा शिवारातील शहरात भूखंड विक्री करणाऱ्यांनी झाडांची विनापरवानगीने कत्तल केली आहे. रस्त्यालगत हा प्रकार सर्रास सुरू असताना वनविभागाने कोणतीही कारवाई केली नाही. पर्यावरणाचे रक्षण करण्याचे दावे येथे कागदोपत्री दिसत आहेत. झाडे लावा झाडे जगवा असे या ब्रीद वाक्याला तडे जात आहे. तुमसर-भंडारा राज्य महामार्गावर खापा शिवारात एका बारजवळ अनेक झाडांचे ओंडके पडले आहेत. या बारच्या मागे देशमुख यांची शेती आहे तेथे अनेक मोठी झाडे आहेत. त्यात आंजन व बोरीच्या झाडांचा समावेश होता, ही झाडे कापण्यात आली आहेत याठिकाणी ले-आऊट टाकण्यात येत आहे. नियमानुसार ही झाडे कापण्याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे अनिवार्य असते. ती परवानगी ले-आऊट धारकांनी घेतलेली नाही. वन विभागाचीसुद्धा परवानगी घेण्यात आलेली नाही. ही झाडे सुमारे ३० ते ३५ वर्षापूर्वीची होती. या झाडांना जमिनीपासून उपटण्याकरिता जेसीबीचा वापर निश्चितच करण्यात आला असावा, असे प्रथमदर्शनी दिसून येते. रात्रीच्या सुमारास ही कामे करण्यात आली आहेत. ले-आऊट धारकाने ही झाडे एका लाकूड व्यापाऱ्याला विकली. मुख्य रस्त्यावर उभे राहिले असता ती दिसतात. परंतु वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना अजुनपर्यंत दिसली नाही. शहरातील पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त करून संबंधित ले-आऊट धारकांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. शहराबाहेर अनेक ले-आऊट पाडणे सुरू असून त्यातील उभी झाडे कापली जात असून ती नियमानुसार कापण्याची रितसर परवानगी संबंधित विभागाकडून घ्यावी लागते, परंतु घेण्यात आली नाही. याची चौकशी होऊन कारवाई करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
विनापरवानगीने झाडांची कत्तल
By admin | Updated: July 2, 2014 23:12 IST