आणखी मासे अडकणार : बनावट कागदपत्रांवर आयटीआयमध्ये प्रवेश, समितीच्या चौकशीत अनेक घबाड आले उघडकीसलाखांदूर : मागील अनेक दिवसांपासून गाजत असलेला लाखांदूर आयटीआयमधील आॅनलाईन प्रवेश भरती घोटाळ्याची त्रिस्तरीय चौकशी समितीने अंतिम अहवाल दिला. या अहवालानुसार दोषी सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तर खोटे गुण वाढवून अवैधरीत्या प्रवेश दिल्याप्रकरणी दोन कंत्राटी शिल्पनिदेशकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयाने दिले आहे.लाखांदूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन २०१४-१५ या सत्रात आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया घेण्यात आली होती. या दरम्यान आॅनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या संस्थेत मूळ कागदपत्राची तपासणी व आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान पात्र, विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात सहा नियमीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काही विद्यार्थ्यांनी मूृळ गुणपत्रिकेत खोडतोड करुन आॅनलाईन अर्ज सादर केले असताना संस्थेत मूळ कागदपत्राची तपासणी करणे गरजेचे होते. परंतू आर्थिक व्यवहार केल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले. प्रबोधन सेवक पोवनकर या विद्यार्थ्याचे गुणपत्रिकेतील मूळ गुण ७१ टक्क्यांवरुन ६७.८४ टक्के गुण कमी करण्यात आले. अन्य दोन विद्यार्थ्यांचे मूळ गुणपत्रिकेतील गुण कमी करण्यात आले. त्यामुळे त्यांना या संस्थेत प्रवेश मिळू शकला नव्हता. तिन विद्यार्थ्यांचे गुण वाढवून मूळ गुणपत्रिकेत खोडतोड केल्याचे दिसून आले. काही विद्यार्थ्यांचे आठवीच्या गुणपत्रिकेमध्ये खोडतोड करुन गुण वाढविल्याचे दिसून आले. अशाप्रकारे गुण वाढवून २२ प्रशिक्षणार्थ्यांना अवैधरित्या प्रवेश दिल्याचे चौकशी समितीने अहवालात नमुद केले आहे. दरम्यान, पाच विद्यार्थ्यांचे बयाण घेतले असता कंत्राटी, तासीका तत्वावर कार्यरत वाय. जी. प्रधान, डी. ए. साखरे यांनी गुण वाढवून प्रवेश देण्याकरिता तीन प्रशिक्षणार्थ्यांकडून आठ हजार रुपये घेतल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले.नागपूर येथील त्रिस्तरीय चौकशी समितीने चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. यावेळी संशयित १३ प्रकरणाची शहानिशा करण्यात आली. त्यापैकी १२ प्रकरणामध्ये आॅनलाईन प्रवेश नोंदणी अर्ज उपलब्ध नसल्यामुळे घबाड उघडकीस आले. त्यामुळे आॅनलाईन प्रवेश अर्ज, प्रवेश दस्ताऐवजामधून गहाळ झाल्याने हा प्रकार झाल्याचे समजून चौकशी समितीने सखोल केली असता धक्कादायक प्रकार चौकशी समितीला दिसून आले.चौकशीअंती अहवाल सादर करीत प्रवेश समितीला मुख्य जबाबदारी सोपविलेले कर्मचारी पी. वाय. साकुरे, के.जी. काटोले, व्ही. आर. गावंढे, सहकर्मचारी बी. पी. चांदेवार, पी. बी. भांगे, एस. एस. बोडे, वरिष्ठ लिपीक यांनी त्यांचेकडे सोपविलेले काम जबाबदारीने पार न पाडता खोटे गुण वाढवून १९ प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश दिल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ चे नियम ४ (१) (अ) अन्वये या सहाही जणांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करुन ३० आॅक्टोंबरपासून निलंबीत करण्याची कारवाई करण्यात आली. कंत्राटी कर्मचारी वाय. जी. प्रधान, डी. ए. साखरे यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी लाखांदूर पोलीस ठाण्यात प्राचार्य कदम यांनी तक्रार दाखल केली आहे.सदर आॅनलाईन भरती प्रक्रीयेत नियमित कर्मचारीसुध्दा दोषी असून त्यांचेवर केवळ निलंबनाची कारवाई तर कंत्राटी कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहसंचालकांनी देऊन नियमित कर्मचाऱ्यांची पाठराखण केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्या सहाही कर्मचाऱ्यांविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
सहा कर्मचारी निलंबित, दोघांविरूद्ध फौजदारी गुन्हे
By admin | Updated: October 31, 2015 01:29 IST