सर्वपक्षीय नेत्यांची मागणी : शुक्र वारी काढणार निषेध मोर्चाभंडारा : शहरातील म्हाडा कॉलनी व समृद्धीनगरात दरोडा टाकून महिलेचा खून व अन्य दोघांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषन विभागाकडे सोपविण्यात यावा. या घटनेसंदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींचा जिल्हाधिकाऱ्यांनी अपमान केला. कायदा व सुव्यवस्थेबद्दल गंभीर नसलेल्या जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांविरुद्ध शुक्र वारला निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारला आयोजित पत्रपरिषदेत दिली.यावेळी बोलताना परमानंद मेश्राम म्हणाले, अमीर शेख व सचिन राऊत या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी यात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे. परंतु, त्या दिशेने पोलिसांनी तपास केलेला नाही. म्हाडा कॉलनीतील अश्विनी शिंदे या तरुणीवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी वेळीच तपासाला गती दिली असती प्रिती पटेल या महिलेचा मृत्यू झाला नसता. दोन्ही आरोपी हे अंमली पदार्थाच्या आहारी गेले होते. परंतु, घटना घडल्यापासून पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. हे अंमली पदार्थ कुठून येतात, त्याचा सूत्रधार कोण हे पोलिसांना ठाऊक असूनही अद्यापही कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या मुकसंमतीनेच हे व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोपी अमीर शेख हा अस्वस्थ झाल्यानंतर सिटी स्कॅनसाठी त्याला नागपूरला नेण्यात आले. त्याचे सिटी स्कॅन भंडाऱ्यातही होऊ शकले असते. परंतु, पोलिसांनी त्याला नागपूरला पाठविले. आरोपीच्या कुटुंबीयांना त्याला भेटण्याची मुभा दिली जात असून बाटलीबंद पाणी पुरविले जात आहे. आरोपींना मिळणाऱ्या अशा सुविधेवर नगराध्यक्ष बाबुराव बागडे, प्रेमसागर गणवीर, महेंद्र गडकरी, प्रशांत लांजेवार यांनी आक्षेप घेत पोलिसांच्या तपासावर टीका केली. या संवेदनशील घटनेसंबंधात सर्वपक्षीय नेते जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता जिल्हाधिकाऱ्यांनी हे माझ्या अधिकारात येत नसल्याचे म्हणने चुकीचे आहे.यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे उपस्थित होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासावर शंका असल्याने हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावे व जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्र वारी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पत्रपरिषदेला किरीट पटेल, विकास मदनकर, सूर्यकांत इलमे, अॅड. श्रीकांत वैरागडे, नरेश गोंडाणे, सचिन घनमारे, अमृत पटेल, प्रभात मिश्रा, जितू पटेल, संजय सतदेवे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
खुनाचा तपास सीआयडीला सोपवा
By admin | Updated: August 6, 2015 01:43 IST