इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संभाव्य तिसरी लाट दारावर असताना जिल्ह्यातील मंदिरे उघडावित काय? यावर खलबते सुरू झाले आहे. यासंदर्भात राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांशी बोलणी केल्यावर या मुद्द्यावर एकमेकांकडे बोट तर दाखविलेच. शिवाय मानवी आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे, असा सूरही व्यक्त करण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरीचा काळ वगळता दीड वर्षांपासून मंदिरे बंदच आहेत. मंदिरात एकदम गर्दी होऊ नये व त्यामुळे कोरोना पसरु नये, हिच यामागचे उदिष्ट होते. आताही तिच परिस्थिती कायम आहे. भाजपने मंदिरे उघडावित म्हणून आंदोलने केली होती. भाजपच्यावतीने राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावी असा सूर व्यक्त केला आहे. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मते, कोरोनाला आळा घालायचा आहे धार्मिक भावना कुणाचाही दुखावू नये याचीही काळजी घेतली जात असल्याचेही या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मंदिरे उघडावित की नाही यासाठी राजकीय पदाधिकारी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत आहे.
केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स कठाेर- केंद्र सरकारने काेराेनाबाबत गाईडलाईन्स इतक्या कठाेर केल्या आहेत की राज्य सरकारला निर्णय घेणे अडचणीचे जात आहे. आम्हीपण इश्वराला मानताे. पण परिस्थितीनुसार राज्यसरकार जे निर्णय घेईल त्याचा आम्ही आदर करीत आहाेत. मानवी जीवाला प्रथम प्राधान्य आहे. - माेहन पंचभाई, जिल्हाध्यक्ष, काॅंग्रेस
लाखोंची उलाढाल ठप्पमंदिरे उघडली नसल्याने लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे. या मंदिरावर अवलंबून असलेली शेकडो कुटुंबांची ही वाताहत होत आहे. फुल व पूजेचे साहित्य विकणार्यांची मोठी कुचंबणा होत आहे. पर्यायाने उलाढाल थांबल्याने संसाराचा गाडा चालवायचा तरी कसा, असा प्रश्न या कुटुंबासमोर उभा ठाकला आहे.
केंद्र सरकारला अडचण आहे- मंदिरे उघडायला हरकत नाही. परंतु त्याबाबत केंद्राला फार माेठी अडचण आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. लाॅकडाऊन वाढवा, नियम पाळा असे केंद्र सरकार म्हणत आहे. त्यामुळेच अडचण आली आहे. - रवी वाढई, जिल्हाध्यक्ष, शिवसेना
निर्णय घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची- मंदिरे उघडायला हवीत. जिल्ह्यात काेराेनाचे प्रमाण नाहीच्या बराेबर आहेत. राज्य सरकारने सर्वच क्षेत्रात नियम शिथील करुन व्यवहार सुरु केले आहेत. केंद्र सरकारनेही याबाबतचा निर्णय राज्य सरकारे घेतील असे स्पष्ट केले आहे. मात्र राज्य सरकारची मंदिर उघडण्याची मनस्थिती दिसत नाही. - प्रशांत खाेब्रागडे, महामंत्री, भाजप
मानवी आराेग्याला प्रथम प्राथमिकता- जिल्ह्यात मंदिरे उघडायला हरकत नाही. मात्र केंद्रानेच याबाबत विविध अटी व नियम लादले आहेत. राज्य सरकारने मानवी आराेग्याला प्राधान्य देत मंदिरे उघडण्याबाबत सध्यातरी कुठलाही आदेश काढलेला नाही. केंद्राचेच यामध्ये अवराेधाची भूमिका दिसून येत आहे. - नाना पंचबुध्दे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
भाविक म्हणतात....
गत दीड वर्षातील काही काळ वगळता मंदिरे बंदच आहेत. नियम व अटी लागू असल्याने मंदिरे व अन्य धार्मिक स्थळे बंद असल्याचे जाणवत आहे. मात्र भाविकगण मंदिराबाहेरुनच आराध्य देवतेचे दर्शन करुन परततात. ऐन सणासुदीच्या व श्रावण महिन्याच्या काळातही भाविकांना मंदिरात जाता आले नाही. आतातरी भाविकगण शासनाकडे उघडदार देवा आता, उघडदार देवा असे म्हणताना दिसून येत आहे. शासनाला काेराेनाची टांगती तलवारीची भीती वाटत आहे.