वीज दरवाढ : पुन्हा इंधन समायोजन आकार लागूभंडारा : महावितरणने मे, जून व जुलै या तीन महिन्यांसाठी इंधन समायोजन आकार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ टक्के वीज दरवाढीमुळे दरमहा कोट्यवधी रूपये ग्राहकांच्या खिशातून काढले जाणार आहेत. त्यामुळे हा वीज दरवाढीचा ‘शॉक’ सामान्य ग्राहकांना बसणार आहे.मे, जून व जुलै २०१६ मध्ये येणाऱ्या अनुक्रमे एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या बिलांमध्ये दरमहा किमान ५०० कोटींहून अधिक इंधन समायोजन आकार लागू करण्यात आला आहे. हा मागील दराने देण्यात आलेला ११ टक्के वीज दरवाढीचा ‘शॉक’ आहे. नोव्हेंबर २०१५ पासून तीन महिने दरमहा ५९१ कोटी रूपये इंधन समायोजन आकार लागू झाला होता. त्यानंतर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापुढे इंधन समायोजन आकार लागू होणार नाही, तर काही ठिकाणी यापुढे इंधन समायोजन आकार अधिक लागणार नाही, असे जाहीर केले होते. तथापि, या सर्व घोषणा फोल असल्याचे महावितरणच्या कृतीतून दिसून आले आहे. २६ जून २०१५ रोजी नवीन वीज दर निश्चिती करताना आयोगाने सरासरी ८.५ टक्के दरवाढीला मंजुरी दिली आहे. तथापि त्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये १३ टक्के, फेब्रुवारी २०१६ मध्ये ९ टक्के व मे २०१६ मध्ये ११ टक्के इंधन समायोजन आकार लागू करण्यात आला आहे. सरासरी एकूण १९.५ टक्के वीज दरवाढ ग्राहकांच्या माथी मारण्यात आले आहे. वाढत्या, अवाजवी इंधन समायोजन आकारणीमुळे राज्यातील सर्व औद्योगिक वीज ग्राहकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. राज्यात औद्योगिक वीजदर लगतच्या राज्यांपेक्षा २५ ते ३५ टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांत औद्योगिक वीज वापरातील वाढ शून्य आहे. अशावेळी १० टक्के वीजदराचा फटका उद्योगधंद्यांसाठी जाचक आहे. या ना त्या निमित्ताने विजेची दरवाढ करून ग्राहकांना मन:स्ताप दिला जात आहे. यामुळे सामान्य वीज ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. छुप्या पध्दतीने होणारी ही वीज दरवाढ मागे घ्यावी, असा सूर आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
नागरिकांना महावितरणचा ‘शॉक’
By admin | Updated: June 4, 2016 00:19 IST