कोंढा (कोसरा) : मागील दोन तीन वर्षात शेतकरी धानपिकाला त्रस्त झाले आहेत. दरवर्षी येणारे नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यावर्षी कोरडवाहू शेतकऱ्यांना चौरास भागात पावसाने पाठ फिरवल्याने धानाची उतारी झपाट्याने कमी झाली आहे. अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांना तर धानाचे वाळलेले रोप कापण्याची पाळी आल्याने दिवाळीपुर्वी शेतकरी आर्थिक चिंतेत आहे.कोंढा परिसरातील चौरास भागात धान हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. १०० दिवसाचे धानाचे पिक दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या हातात येते. पाणी पाऊस ठिक असल्यास हलक्याप्रतीच्या धानपिकाचे चूर्णा करून शेतकऱ्याजवळ दिवाळीसाठी पैसा येत असे. यावर्षी पावसाचे प्रमाण परिसरात अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना दुबार तिबार धानाचे रोप लावावे लागले. अशातच पावसाने आॅक्टोंबर महिन्यात पाठ फिरवल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांचे पिक गेले. ज्यांचे धानपीक तलाव, कालव्याचे पाणी घेवून पीकले ते देखिल पूर्णत: निघण्यास उशिर आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक कोंडीत सापडला आहे. यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा विचारदेखील प्रशासनाने केला नाही. त्यामुळे शेतकरी सध्यातरी चिंतेत सापडला आहे. धान शेतीचा खर्च ऐकरी जवळपास २० हजार रूपये आला आहे. पण हे रूपयेदेखील कोरडवाहू शेतकऱ्यांची निघण्याची चिन्हे दिसत नाही. कोंढा, कोसरा, चुऱ्हाड, सोमनाळा, नवेगाव, सोनेगाव, विरली खं. व इतर गावच्या कोरडवाहू शेतकरी संकटात सापडला आहे. (वार्ताहर)
धानपीक उत्पादक दुष्काळाच्या छायेत
By admin | Updated: October 25, 2014 22:35 IST