जिल्हा परिषदचे दुर्लक्ष : तलावाची स्वच्छता कुणी करावी, मासे मृत्यूचा अहवाल निरी पाठविणारमोहन भोयर तुमसरशहरातील भूजली तलावात मागील आठवड्यात हजारो माशांचा मृत्यू झाला होता. येथील पाणी व मृत माशांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. या तलावात शहरातील काही भागातील सांडपाणी जाते. जिल्हा परिषद प्रशासनाचे येथे दुर्लक्ष आहे. नैसर्गीक पाणी दूषित करण्याचा अधिकार कुणालाच नाही. शहर परिसरातील तलावांची काळजी कोण घेणार हा प्रश्न येथे उपस्थित होतो.तुमसरात जुन्या शहराच्या मध्यभागी भूजली तलाव आहे. या तलावाची मालकी जिल्हा परिषद प्रशासनाकडे आहे. परंतु तलावाकडे जिल्हा परिषदचे कायम दुर्लक्ष आहे. मागील आठवड्यात या तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाला होता. तलावातील पाण्याचे व माशांचे नमूने नागपूर येथील निरी या संस्थेकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.उपजिल्हा रुग्णालय, तुमसर व जिल्हा परिषदेच्या प्रयोगशाळेने पाणी गढूळ असल्याचा अहवाल दिला आहे. तलावाच्या सभोवताल नागरिकांची वस्ती आहे. शहरातील काही वॉर्डांचे सांडपाणी नालीद्वारे या तलावात विसर्ग केल्या जात आहे. नालीचे बांधकाम येथे करण्यात आले. तलाव परिसरात अतिक्रमणही करण्यात आले आहे. त्यांचेही सांडपाणी सर्रास तलावात सोडण्यात येत आहे.मच्छिंद्रनाथ सहकारी मच्छीमार सोसायटीकडे हा तलाव भाडे तत्वावर आहे. सुमारे सात ते आठ लाखांचे मासे येथे मृत्युमूखी पडले. या तलावात सध्या एक मासाही जिवंत नाही. जिल्हा परिषद प्रशासन तलाव भाडे तत्वावर देते, परंतु तलाव खोलीकरण व तलावाची काळजी मात्र घेत नाही. त्यामुळे हा तलाव नगरपरिषदेकडे हस्तांतरण करण्याची गरज आहे. मासे मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाईची मागणी मासेमार बांधवांनी शासनाकडे केली आहे.शहराच्या हद्दीतील तलावांची काळजी कोण घेणार हा मुख्य प्रश्न आहे. नैसर्गिक तलावातील पाणी दूषित करण्याचा अधिकार कुणालाच नाही. पाणी दूषित करणे हा गुन्हा आहे. संबंधितावर येथे कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे, परंतु प्रशासन येथे मूग गिळून गप्प आहे.पाणी दूषित करण्याचा अधिकार कुणालाच नाही. शहरातील सांडपाणी येथे जात असेल तर ते तात्काळ बंद करण्यात येईल. तलाव स्वच्छ असणे गरजेचे आहे.-चंद्रशेखर गुल्हाणे, मुख्याधिकारी, तुमसर.शहराच्या हद्दीत तलाव स्वच्छ ठेवणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. मालकी कुणाचीही असो, शहरातील हा तलाव शेवटची घटका मोजत आहे. -मो. तारिक कुरैशी, जिल्हाध्यक्ष, भाजप.तलावातील पाणी व मृत मासे नागपूर येथील निरी येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. लवकरच तिथून अहवाल प्राप्त होईल. त्यानंतरच माशांचा मृत्यू कशाने झाला हे कडेल.-शिल्पा सोनुले, उपविभागीय अधिकारी, तुमसर.
'त्या' तलावात सोडले जाते शहरातील सांडपाणी
By admin | Updated: August 6, 2016 00:30 IST