तासन्तास रांगेत उभे : तांत्रिक समस्यांमुळे नागरिक मेटाकुटीसतुमसर : शासन तथा सर्व सामान्यांना दिलासा देऊन तात्काळ कामांची हमी देणारे तहसील कार्यालयातील सेतू केंद्र सध्या डोकेदुखी ठरले आहे. तांत्रिक अडचणींमुळे तीन ते पाच तास येथे नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे वेळेत प्रमााणपत्र मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरत आहे.तुमसर तहसील कार्यालयात राज्य शासनाने सेतू केंद्र सुरु केले आहे. शासनाने येथे कमी संगणक पुरविले आहेत. कागदपत्रे आॅनलाईन होत असल्याने इंटरनेटची समस्या येथे नेहमीच असते. हायस्पीड इंटरनेट सेवा दिल्याचा दावा संबंधित विभाग करीत आहे. सर्व्हर येथे नेहमीच डाऊन असतो. त्यामुळे येथे कामे खोळंबतात. रांग येथे राहणे नित्याचेच झाले आहे.ऊन्हाळ्यात उन्हात उभे राहून घामाने तर पावसाळ्यात पावसात ओले होऊन प्रमाणपत्राकरिता तासन्तास रेंगाळत उभे राहावे लागते. वयोवृद्ध महिला, पुरुष तथा मुलींना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात तहसील प्रशासनाने आम्ही काहीच करू शकत नाही, असा पवित्रा घेतला आहे. शासनाने सेतू केंद्राचे कंत्राट खासगी संस्थेला दिले आहे. परंतु किमान शासनाने उच्च दर्जाचे साहित्य व तंत्रज्ञान पुरविण्याची गरज आहे. सेतू केंद्रामुळे तात्काळ व पारदर्शी कामे होतील असा दावा केला होता. येथे कामे पारदर्शी होतात. परंतु तात्काळ कामे कधीच होत नाही. तांत्रिक कारण पुढे केली जातात. तांत्रिक त्रुट्या येथे दूर करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
सेतू केंद्र ठरले डोकेदुखी केंद्र
By admin | Updated: July 28, 2015 01:11 IST