भंडारा : शुक्रवारी वार्डातील तुंबलेल्या नाल्या, समाजमंदिर, पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्ते, साफसफाई, बगिचा, अतिक्रमण इत्यादी समस्या पाहून जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी यांची चांगलीच कानउघाडणी केली.शहर सुधार समितीच्या वतीने शुक्रवारी वॉर्डमधील नागरी सोई सुविधांच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. याची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता या प्रभागाचा दौरा केला. याप्रसंगी या वार्डातील नागरिकांनी त्यांच्या समस्या जिल्हाधिकारी यांना सांगितल्या. या भागातील नाल्यांची साफसफाई होत नसल्यामुळे तुंबलेल्या नाल्या जिल्हाधिकाऱ्यांना दाखविण्यात आल्या. काही ठिकाणी नाल्यावरच घर बांधलेले आढळून आले.अतिक्रमणाचा मोठा प्रश्नही या भागात जिल्हाधिकारी यांच्या निर्दशनास आणून देण्यात आला. ज्या ठिकाणी बगिच्यासाठी भूमिपूजन करण्यात आले होते ती जागा आता उकिरडा झाल्याचे नागरिकांनी दाखवून दिले. काही नागरिकांनी त्यांच्या घरी सहा महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्याचे सांगितले. या भागातील नागरिकांच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून नगर परिषद मुख्याधिकारी यांना या सर्व समस्या तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले. तसेच सार्वजनिक शौचालयांची नियमित साफसफाई करावी, रोज पाणी पुरवठा करावा, डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी नियमित फवारणी, कचऱ्यांचे व्यवस्थापन, रस्त्यांचे व सभागृहाचे बांधकाम इत्यादी कामे तातडीने करावीत, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत नगराध्यक्ष बाबु बागडे, उपाध्यक्ष कविता भोंगाडे, नगरसेवक धनराज साठवणे, साखरकर, जिल्हा प्रकल्प अधिकारी विजय देवळीकर, मुख्याधिकारी रवींद्र देवतळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावा
By admin | Updated: November 22, 2014 00:16 IST