पालकमंत्र्यांचे निर्देश : कटंगी व कलपाथरी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील कटंगी व कलपाथरी प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला व पुनर्वसन अनुदान मिळण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव नियामक मंडळाकडे पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच कटंगी व कलपाथरी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांच्या संदर्भाने आयोजित बैठकीत पालकमंत्री बडोले यांनी सदर निर्देश दिले आहेत. बैठकीला आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, तिरोडा उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी उमेश काळे, गोरेगाव तहसीलदार बांबोडे, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गेडाम, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ढोरे, बाघ-इटियाडोह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता छप्परघरे, लघु सिंचन (स्थानिक स्तर) कार्यकारी अभियंता निखारे यांची प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा सहानुभूतीने विचार करून त्यांना योग्य ते सहकार्य करण्यासाठी आपण तयार आहोत. प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला व पुनर्वसन अनुदान मिळण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू असेही पालकमंत्री बडोले म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ज्या प्रकल्पग्रस्तांनी अनुदान मिळण्यासाठी अर्ज केले नाही त्यांनी त्वरीत अर्ज सादर करावे. त्यांना शासन निर्णयानुसार प्रशासन मदत करणार आहे. कटंगी प्रकल्पातील पाथरीच्या १६२ लाभार्थ्यांपैकी ८६ जणांनी मदत मिळण्यासाठी अर्ज दिले असून ८० लक्ष ६६ हजार रुपयांचा प्रस्ताव, पिंडकेपार येथील १३५ लाभार्थ्यांपैकी ५७ जणांचे अर्ज प्राप्त झाले असून ६३ लक्ष १६ हजार रुपयांचा प्रस्ताव, हिरापूर येथील २ लाभार्थ्यांचे ११ लक्ष ८१ हजार रुपये निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पिंडकेपार येथील ४५ लाभार्थी व पाथरी येथील ३१ लाभार्थ्यांनी मोबदला मिळण्यासाठी अर्ज केलेले नाही. कटंगी प्रकल्पातील २ प्रकरणातील ७४ लाभार्थ्यांना ५४ लक्ष १९ हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत.कलपाथरी प्रकल्पातील गोरेगाव (महाजनटोली) येथील २६ लाभार्थ्यांना ८८ लक्ष ४८ हजार रुपये पुनर्वसन अनुदानासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना शासन निर्णयातील अटींना धरून दिले आहे. घुमर्रा येथील ७३ लाभार्थ्यांपैकी ६१ जणांनी अर्ज दिले असून ३६ लाख ५८ हजार रुपये निधीला त्वरीत मंजूरी घेण्यात येईल, असे यावेळी तिरोडा उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी सांगितले. भगतटोला, सोनारटोला, आकुटोला, कन्हारटोला, चोपा, मोहगाव, बाजारगाव व उर्वरित ४ प्रकल्पबाधीत गावातील नागरिक व शेतकऱ्यांना घराचा मोबदला, पुनर्वसन अनुदान, सानुग्रह अनुदान व वाढीव मोबदला देण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्तांची मागणी पुन्हा वाढीव पुनर्वसन मोबदला व पुनर्वसन अनुदान मिळावे ही असून यासाठी जवळपास ६ कोटी रुपये निधी लागणार आहे. बैठकीला प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे डी.जे. गौतम, के.आर.कटरे, शिवराम पटले यांचेसह अन्य सदस्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
मोबदल्यासाठी प्रस्ताव पाठवा
By admin | Updated: October 5, 2015 00:59 IST