मोहन भोयर ल्ल तुमसरधानाचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या तुमसर तालुक्यात अद्याप शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. येथे शेतकऱ्यांच्या बांधावर व्यापारी जाऊन धान खरेदी करीत आहेत. बाजार समितीतील सुध्दा धानाला कमी भाव मिळत असून २५० ते ३०० रूपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.राज्य शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केल्याची घोषणा केली. परंंतू, प्रत्यक्षात धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. १ आॅक्टोबरपासून तालुक्यात हलके धान निघाले. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी धान विक्री करणे सुरू केले. धानाला व्यापाऱ्यांनी सुरूवातीपासून भाव दिला नाही. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील २० दिवसापासून धानाची आवक वाढली. येथेही प्रति क्विंटलमागे शेतकऱ्यांना किमान २०० ते ३०० रूपये तोटा सहन करावा लागत आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डावर अडतीया मार्फत धानाची बोली बोलली जाते. निश्चितच बोलीची सुरूवात येथे कमीच राहते. धानाची आवक वाढल्याने दलालांची तथा व्यापाऱ्यांची सध्या बल्ले-बल्ले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी प्रत्यक्षात बांधावर जावून धान खरेदी करणे सुरू केले आहे. येथे शेतकऱ्यांची मोठी लूट होत आहे. परंतु, नगदी रक्कम मिळत असल्याने सर्वसामान्य शेतकरी या व्यापाऱ्यांकडे आकर्षित होत आहे. आधारभूत धान खरेदी आज होईल, उद्या होईल याकडे बळीराजा नजरा लावून होते. मात्र, अद्याप धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही, ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल.दिवाळी आली असतानाही शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही, बाजारात गर्दी नाही त्यामुळे व्यापारीसुध्दा हातावार हात देऊन ग्राहकांची प्रतिक्षा करीत आहेत. मागील शासनाच काळात सप्टेंबर महिन्यात नियोजन करून १५ आॅक्टोबरपर्यंत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले होते. सध्या तसे आदेश प्राप्त झालेले नाही. आदेश प्राप्त झाल्यावरही किमान १५ दिवस नियोजनाकरिता लागणार आहेत. नियोजनाचा येथे अभाव दिसून येतो. मागील एक महिन्यापासून शेतकरी धान विक्री करीत आहेत. हे धान व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतले आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाल्यावर ही व्यापारी मंडळी धान खरेदी केंद्रावर हे धान विक्री करून मोठा नफा कमावण्याची शक्यता अधिक आहे. उशिरा धान खरेदी केंद्र सुरू करण्यामागची ठोस कारणे शासन सांगण्यास असमर्थ ठरले आहे.शेतकऱ्यांना संपवण्याचा हा कुटील डाव आहे. भाजप प्रणित केंद्र व राज्य शासन लहान शेतकऱ्यांचा बळी घेत आहेत. मागील शासनाच्या काळात सप्टेंबरमध्येच नियोजन होऊन १५ आॅक्टोबरपर्यंत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले होते.- अनिल बावनकर,माजी आमदार, तुमसर.
धानाची बांधावर विक्री
By admin | Updated: November 9, 2015 04:47 IST