लाखनी : ग्रामीण रस्त्यावर दररोज शेकडो वाहने धावतात. त्यात ९० टक्के वाहन चालकांजवळ परवानाच नसतो. परिणामी ग्रामीण भागात घडणाऱ्या अपघातांची पोलीस दप्तरी नोंद न होता असे प्रकरण मिटविले जाते. या वाहन चालकांमुळे असुरक्षा वाढली असून उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलिसांचे केवळ शहराकडे लक्ष असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात आता प्रत्येक घरी दुचाकी आली. कुटुंबातील लहानात लहान मुलगा वडीलधाऱ्यांकडे वाहन चालविण्यासाठी हट्ट धरतो. त्याचा हट्ट पुरविण्यासाठी अनेक पालक मुलांच्या हातात दुचाकीची चावी देतात. यातून अनेकदा अपघात घडतात. पाचव्या वर्गात शिकणारा व ओठावर मिशीची कोर न आलेला मुलगाही गावातून ‘फ्लॅश’ मारत सुसाट वेगाने दुचाकीने जातानाचे चित्र सर्वत्र दिसून येते. सोबत आपल्या अप्रशिक्षित मित्रालाही गावातून, शाळेसमोरून जाण्यासाठी वाहन चालविण्यास सहकार्य करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर, काहींकडे ट्रक आहेत. त्यापैकी बहुतांश चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो. (तालुका प्रतिनिधी)
अप्रशिक्षित वाहनचालकांमुळे सुरक्षा धोक्यात
By admin | Updated: September 1, 2016 00:47 IST