मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मॅगनीज शुद्धीकरण कारखाना मागील २० वर्षांपासून कायम बंद आहे. कारखानदाराने येथील दोन युनिट रायपूर येथील भंगार व्यावसायिकाला २६ कोटी ७० लाखांत विक्री केले. जमिनीची विक्री केलेली नाही. मात्र आता हा कारखाना सुरू होण्याच्या आशा मावळल्या आहेत.
युनिव्हर्सल कारखाना जुन्या युनिटची स्थापना १९५५ मध्ये करण्यात आली होती. त्याला आता ६९ वर्षे झाली आहेत तर नवीन युनिटची स्थापना १९८२ मध्ये झाली होती. त्याला ४२ वर्षे झाली. मागील वीस वर्षांपासून हा कारखाना बंद आहे. हा कारखाना आता काही दिवसात भुईसपाट होणार आहे. दोन्ही युनिटचे स्क्रैप काढणे व ते रायपूरला घेऊन जाणे याकरिता या भंगार व्यावसायिकाला पुन्हा सुमारे ३ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. कारखानदाराकडे सुमारे ३०० एकर शेती कारखाना परिसरात आहे. कारखानदारांनी ही मौल्यवान शेती मात्र विकली नाही.
दोन्ही युनिटची विक्री कारखानदाराने केली. त्यामुळे आता हा कारखाना पुन्हा सुरू होण्याच्या आशा मावळल्या आहेत. कारखाना आता इतिहास जमा झाला आहे. बेरोजगारीवर मात करण्याकरिता कारखान्याला पुन्हा उभा करण्याकरिता शासनाकडून प्रयत्न करण्याची गरज होती. परंतु ती येथे होताना दिसत नाही. स्टार्ट अप इंडिया असे घोषवाक्य केंद्र सरकारने दिले, परंतु त्या घोषवाक्याला येथे हरताळ फासला जात आहे.
३०० एकर शेतीपरिसर भुईसपाट केला जाणार आहेजिल्ह्यात उद्योगांची संख्या आधीच कमी असताना बंद कारखान्यांची यादी वाढत आहे. युनिव्हर्सल कारखाना बंद झाल्याने जिल्ह्यातील उद्योगांवर अवकळा आली आहे.
अवसानयानात का गेला युनिव्हर्सल कारखानामहागडी वीज खरेदी करणे कारखानदारांना परवडणारे नाही. राज्यात कारखान्याला पूर्ण देणारी वीज प्रतियुनिट ही तेरा रुपये आहे तर इतर राज्यातही ५.५० पैसे इतकी आहे. त्यामुळे येथील कारखानदाराने कारखाना बंद केला. यापूर्वी या कारखानदाराला एनटीपीसीतर्फे सवलतीच्या दरात वीज उपलब्ध होत होती. मात्र बिलच न भरल्याने तुट सातत्याने वाढत गेली. त्यातच वीज पुरवठा खंडीत करण्यात आला.
रशियन बनावटीची यंत्रे गेली आता भंगारातयुनिव्हर्सल फेरो हा भंडारा जिल्ह्यातील पहिला कारखाना होता. येथील भट्टी (फर्नेस) ही रशियन बनावटीची होती. रशियाचे अभियंते येथे त्याकरिता आले होते. ट्रान्सफॉर्मर तसेच इतर तांत्रिक साहित्याच्या समावेश आहे. रायपूर व परिसरात लहान, मोठे मँगनीज शुद्धीकरणाचे कारखाने आहेत. त्यामुळे येथील भंगारातील साहित्य त्यांना उपयोगी पडणार असल्यानेच या भंगार व्यावसायिकाने कारखानदाराला मोठी किंमत दिली.