चुल्हाड/सिहोरा : सिहोरा परिसरात चोरट्यांची स्कार्प टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीच्या रडारवर वयोवृद्ध महिला आहेत. दिवसाढवळ्या घरात प्रवेश करून या टोळीने महिलांचे दागिने पळविले आहेत. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.मध्य प्रदेश राज्य सीमा आणि नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या सिहोरा परिसरात चोरीच्या घटना वाढत आहेत. दिवसाढवळ्या हा चोरीचा प्रकार सुरु आहे.मागील दोन महिन्यात ८-१0 चोर्या भरदिवसा घडलेल्या आहेत. चोरांच्या स्कार्प टोळीने परिसरात दहशत पसरली आहे. स्वत:च्या घरात सामान्य नागरिक असुरक्षित असल्याचा अनुभव घेत आहेत. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारी झाल्या आहेत.परंतु चोरांना अद्याप अटक करण्यात आली नसल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. सध्या स्थित रोजगार हमी योजनेची कामे गावागावात सुरु आहेत.घरातील कर्ते मंडळी रोहयोच्या कामावर जात आहेत. सकाळी १0 ते दुपारी १ पर्यंत घरात वयोवृद्ध नागरिक घराची देखरेख करीत आहे. याच कालावधीत वयोवृद्ध महिलांना स्कार्प टोळीतील सदस्य टारगेट करीत आहेत.गावात सकाळी ९ च्या सुमारास टोळीतील सदस्य दाखल होत आहेत. दुचाकीने प्रवेश करणारे २५-३0 वयोगटातील दोन तरुण आहेत. हे तरुण स्कार्प बांधून गावात भ्रमण करीत आहेत. मध्यमवर्गीयाच्या वस्तीत या टोळीतील दोन्ही सदस्यांचे दहशत सुरु झाली आहे.या टोळीने श्रीमंत तथा गर्भश्रीमंतांच्या घरात प्रवेश केलेला नाही. तर आजवरच्या चोरीत गरीब तथा मध्यमवर्गीय असलेल्या वयोवृद्ध महिलांचे दागदागिने पळविली आहे. भरदिवसा घरात कुणी नसल्याची संधी साधून दुचाकीने आलेले हे तरुण वयोवृद्ध महिलांना पिण्याचे पाणी मागत आहेत. याशिवाय कुणी नातेवाईक आजारी असल्याचे सांगत आहेत. वयोवृद्ध महिला सोबत संवाद सुरु असतानाच दागिण्यांची लूट करीत आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने ओढून दुचाकीने पसार होत आहेत. सिहोरा येथे वास्तव्य करणारी ६५ वर्षीय महिला सुलोचना वासनिक यांना २0 हजारांनी गंडविले आहे. ही महिला सकाळी १0 च्या सुमारास गुजरी चौकातून घराकडे परतताना दोन अज्ञात तरुणांनी तिला नातेवाईक आजारी असल्याचे सांगितले. रुग्णालयात जात असल्याचे सांगून तिला दुचाकीवर बसविले. तिला गायत्री मंदिराजवळ आणले. दोन्ही तरुणांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून पसार झाले. यामुळे नागरिकात दहशत निर्माण झाली आहे.एरव्ही रात्री होणार्या चोर्या आता दिवसाढवळ्या होत आहेत. भर दुपारी घराच्या दारावर देण्यात येणारी थाप आता भितीदायक ठरत आहे. नागरिक आता दहशतीत वास्तव्य करीत आहे. या चोरीचा सुगावा लावण्यासाठी पोलीस गुंतले आहेत. स्कार्पधारकांचे स्केच तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे.वयोवृद्ध महिलांना टारगेट करण्यात येत असल्याने त्या भांबावल्या आहेत.हे टोळीधारक जे वाहन उपयोगात आणत आहेत. त्या विनाक्रमांकांच्या दुचाकी आहेत. यामुळे सीसीटीव्ही कॅमेर्यात वाहनाची ओळख होत नाही. सिहोरा परिसरात खुलेआम वयोवृद्ध महिलांचे दागिने पळविले जात आहेत. यापूर्वी दिवसा ढवळ्या सिंदपुरी गावात चोरी झाली होती. हे अज्ञात चोरटे मध्यप्रदेशात पळून गेले होते.बपेरा आंतरराज्यीय सीमा पोलीस बंदोबस्तात ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
सिहोरा परिसरात स्कार्प टोळी सक्रिय
By admin | Updated: May 8, 2014 01:24 IST