वर्गाला जागा मिळाली : आता विद्यार्थ्यांना शिक्षकाची प्रतीक्षा लाखांदूर : आम्हाला गावातच शाळा पाहिजे यासाठी दोन कि.मी. दूरच्या शाळेत जाण्यास नकार देत विद्यार्थ्यांनी झाडाखाली शाळा भरवून आंदोलन केल्यानंतर शिक्षण विभागाने दखल घेत दोन शिक्षक देऊन शाळा सुरु केली. मात्र वर्ग चार शिक्षक दोन असल्याने पुन्हा दोन शिक्षकांची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.लाखांदूर तालुक्यातील इटान येथे गटग्रामपंचायत असून ग्रामपंचायत इमारत व शाळा इटान पासून दूर तीन कि.मी. अंतरावर असलेल्या आबादी येथे असल्याने व येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर रेतीचे जड वाहने धावत असल्याने खड्डेमय रस्ता तुडवत जाण्यापेक्षा आम्हाला इटान गावातच शाळा पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन करून शिक्षण विभागाचे लक्ष वेधले. या शाळेत ७५ विद्यार्थी असूनही इटान येथे शाळा हवी यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांसोबत आंदोलन केले.त्यानंतर इटान येथील १९ पालक शिक्षणाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता दोन शिक्षक देण्याचे मान्य करून समाज मंदिरात शाळा भरविण्यास हरकत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे १ ते ३० सप्टेंबरपर्यंत झाडाखाली भरलेली शाळा समाजमंदिरात भरू लागली. आंदोलनाला यश आल्यामुळे शाळेला जागा मिळाली. मात्र ७५ विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षक असल्याने पुन्हा एक शिक्षक व बंद असलेला शालेय पोषण आहार इटान येथेच शिजविण्यात यावा म्हणून विद्यार्थ्यांनी पुन्हा विषय उचलून धरला आहे.इटान येथील विद्यार्थी शालेय क्रीडा स्पर्धेत अव्वल असून त्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने मागणी पूर्ण करावी अशी इटान येथील विद्यार्थी व पालकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी भरवली झाडाखाली शाळा
By admin | Updated: October 7, 2015 01:47 IST